इन्फोसिस फाऊंडेशनच्या ‘आदिवासी वारली आर्ट कार्यशाळे’ ला चांगला प्रतिसाद

222

आंतरराष्ट्रीय वारली कलाकार राजेश चैत्या वंगाड यांनी दाखवले प्रात्यक्षिक

पुणे : भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित आदिवासी वारली आर्ट कार्यशाळेला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. डहाणू येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वारली कलाकार राजेश चैत्या वंगाड , वारली कलाकार मीनाक्षी वायदा यांनी या कार्यशाळेत प्रात्यक्षिक दाखवले.

भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रा.सुधाकर चव्हाण यांनी वारली कलेचा परिचय करुन दिला. वारली कलाकार मीनाक्षी वायदा, तसेच कलाशिक्षक  वामन लेले उपस्थित होते.

‘भारतीय विद्या भवन ‘ चे मानद सचिव  प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता, येथे रविवार, दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी  सायं ४ ते ८ दरम्यान ही कार्यशाळा झाली. सुलोचना नातू विद्या मंदिर, परांजपे विद्या मंदिरचे शंभर विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले.

आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील निसर्ग, प्राणी, पक्षी, शेती, झोपडया, झाडे , नदी, पाडा (गाव )याचे प्रतिबिंब वारली कलेत उमटते.त्रिकोण आणि सरळ रेषा या माध्यमातून सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या भिजवलेल्या पिठीतून बांबूच्या काडयांनी निर्माण होणारी वारली चित्रकला हे महाराष्ट्राचे वैभव आहे, आणि ते जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सुधाकर चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले.