उच्च विद्याविभूषित, मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधी डॉ. मिलिंद संपगावकर लोकसभेच्या रिंगणात

पुणे : विद्येचे माहेरघर, मध्यमवर्गीयांचे शहर असलेल्या पुण्यात उच्च विद्याविभूषित असलेले मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधी डॉ. मिलिंद संपगावकर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. मध्यमवर्गीयांचा, आर्थिक क्षेत्राशी संबंधित, स्वच्छ प्रतिमेचा व ब्राह्मण चेहरा असलेल्या डॉ. संपगावकर यांच्या एंट्रीने पुणे लोकसभेत आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. येत्या २३ एप्रिल २०२४ रोजी संपगावकर अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पत्रकार परिषद घेऊन डॉ. संपगावकर यांनी आपली उमेदवारी जाहीर करत पुणे लोकसभा मतदारसंघात विजयश्री मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
डॉ. मिलिंद संपगावकर म्हणाले, “देशातील ८२ टक्के लोक मध्यमवर्गीय असून, २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र व्हायचे असेल, तर मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. मात्र, आजवर मध्यमवर्गीयांच्या मुद्द्यांना सर्वच राजकीय पक्षांनी बगल दिलेली आहे. गेल्या १२ वर्षांत यशस्वी उद्योजक व समाजोपयोगी कार्यकर्ता म्हणून काम करता असताना मध्यमवर्गीय विकास मंच संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. मध्यमवर्गीयांचा स्वाभिमान जपण्यासाठी या कोणत्याही मदतीचा, उपक्रमाचा गाजावाजा केलेला नाही. याच मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा आहे.”
“अर्थशास्त्रात पीएचडी असल्याने विमा क्षेत्रातील यशस्वी व विश्वविक्रमवीर विमा प्रतिनिधी अशी माझी ओळख आहे. सिद्धी असोसिएट्समार्फत जवळपास २३ हजार, तसेच रिद्धी लेडी विंग मार्फत सहा हजार परिवारांशी जोडलेलो आहे. व्यवसायामुळे मतदारसंघात २९ हजार परिवारांमध्ये माझा संपर्क आहे. त्याव्यतिरिक्त मध्यमवर्गीय विकास मंचामार्फत साडेसात हजार परिवार जोडलेले असून, मी स्वतः ३८ सहकारी बँका व ४०० हुन अधिक पतसंस्थांचा सल्लागार आहे. विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग असल्याने साडेपाच लाख पुणेकरांचा विश्वास माझ्यावर आहे. माझ्याकडील गुंतवणूकदार, माझ्या संस्थांच्या माध्यमातून साहाय्य मिळालेले लोक मला मतदान करतील,” असा विश्वास डॉ. संपगावकर यांनी व्यक्त केला.
डॉ. संपगावकर पुढे म्हणतात, “विमा व गुंतवणूक क्षेत्रात २६ हजार परिवार आहेत. विमा प्रतिनिधीना मिळणारा मानसन्मान, तसेच विमा क्षेत्राकडे बघण्याचा सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन याचा विचार आजपर्यंत कोणी केला नाही. भारतात १४० कोटी लोकांपैकी फक्त दहा कोटी लोकांकडे विमा पॉलिसी आहेत. हा टक्का वाढवून विमा क्षेत्राला उभारी देण्यासह सर्वांपर्यंत विमा पोचविण्यासाठी विमा प्रतिनिधींच्या अडचणी दूर करण्यासाठी मला लोकसभेत जायचे आहे. या २६ हजार विमा प्रतिनिधींनी आणि कर्मचाऱ्यांनी ठरवले आणि त्यांनी प्रत्येकाने डॉ. संपगावकर यांचे प्रोफाइल १५ ग्राहकांना पाठवले, तर मला सहा लाखाच्या मताधिक्याने विजय मिळेल.”

“मागील तीन महिन्यांपासून यूट्यूब चैनलवर ‘मध्यमवर्गीयांचा आवाज’ नावाने मध्यमवर्गीयांच्या मनातील प्रश्न हे पुणेकरांसमोर मांडले आहेत. त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मध्यमवर्गीय माणसाला सन्मानाने जगण्यासाठी ठोस धोरणे बनवायला हवीत. राज्यात व देशात प्रति माणसी उत्पन्नवाढ, कररचनेतील बदल, शेतकरी व पिकविमा यातील तफावती संदर्भात माझी मते मांडली आहेत. त्याचा आराखडा आपल्याकडे आहे. तो मांडण्यासाठी मला लोकसभेत जायचे आहे. मागील पाच वर्षापासून पिकविमा मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. अनेक शेतकऱ्यांना पिकविमा दावा का मिळत नाही? याबद्दल माझा अभ्यास आहे. संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता मला संसदेत जायचे आहे,” असे पुढे डॉ. संपगावकर म्हणाले.

पुण्याला उच्चशिक्षित खासदाराची गरज का?
नुसते विद्येचे माहेरघर म्हणून पुणे प्रसिद्ध नाही, तर एक महानगर म्हणूनही पुणे उदयास आले आहे. अनेक परदेशी कंपन्या गुंतवणुकीसाठी, प्रकल्प सुरु करण्यासाठी येतात, तेव्हा त्या ठिकाणचा खासदार कोण आहे, हेही पाहतात. पुण्याचा खासदार उच्चशिक्षित, औद्योगिक व अर्थशास्त्राचे ज्ञान असणारा असेल, तर त्यांना प्रकल्प सुरू करताना खासदाराची खूप चांगली मदत होते. नवीन उद्योग व उद्योगपती पुण्यात आणण्याकरिता पुण्याचा खासदार हा उच्चशिक्षित असावा. त्यामुळे युवकांचे रोजगाराचे प्रश्न, छोट्या उद्योगांचे प्रश्न सोडविणे शक्य होईल. शिक्षण व शैक्षणिक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी उच्चशिक्षित खासदारच चांगले काम करू शकतो, असा विश्वास डॉ. संपगावकर यांनी व्यक्त केला.

… तर सुशिक्षित, मध्यमवर्गीय लोक मतदान करतील
सुशिक्षित मध्यमवर्गीय लोक मतदानासाठी बाहेर का पडत नाहीत, हा प्रश्न आपण सुशिक्षित लोकांचा विचारला, तर त्यांच्या मते, ‘ज्या माणसाला निवडून देतोय, तो माझ्यापेक्षा एकतर जास्त शिकलेला अथवा माझ्यापेक्षा जास्त हुशार असलेला पाहिजे. नाहीतर मी त्याला नेता का मानावे?’ अशी भावना त्यांच्या मनात असते. माझ्यासारखा सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित उमेदवार असेल, सुशिक्षित व मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील. पुण्यात होणाऱ्या एकूण मतदानापैकी केवळ ३० टक्के सुशिक्षित अथवा मध्यमवर्गीय मतदार बाहेर पडतात, हा इतिहास आहे. माझ्या उमेदवारीने हा वर्ग मतदानासाठी बाहेर पडेल व त्याचा लाभ थेट मला होईल, असा माझा विश्वास असल्याचे संपगावकर म्हणाले.

 
विकासाच्या मुद्द्यांची जाण असलेला खासदार हवा
देशाचा विचार करता उच्चशिक्षित खासदार संसदेत असणे महत्त्वाचे आहे. देशात सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये मध्यमवर्गीय लोकांचे नाहक बळी जात आहेत. सिबिल स्कोरसाठी कुठलीही संविधानिक संस्था नाही, कुठलाही गुन्हा केला किंवा आरोपीने त्या गुन्ह्याची शिक्षा भोगून परत समाजात आला, तर समाज त्याला स्वीकारतो. मात्र, मध्यमवर्गीय बांधवाकडून एखाद्यावेळी कर्जाचे हप्ते चुकले अथवा काही कारणास्तव हप्ते उशिरा भरले, तर त्याचा सिबिल खराब होतो. आयुष्यभर तो खराबच असतो. या मध्यमवर्गीय बांधवांच्या, व्यवसायिकांच्या, उद्योगपतींच्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी व देशात सिबिलसारख्या व्यवस्थेला योग्य कायद्यात बसवण्यासाठी मला संसदेत आवाज उठवायचा आहे. महाराष्ट्राला पर्यटन राज्य करून उत्पन्न वाढविण्याकरिता, पुण्यातील वाहतूक, रोजगार, रस्ते, यासारख्या पायाभूत सुविधांकरिता मध्यमवर्गीय उच्चशिक्षित डॉ मिलिंद संपगावकर हा एकमेव पर्याय असेल, असे मला वाटते.

कोण आहेत डॉ. मिलिंद संपगावकर?
डॉ. मिलिंद संपगावकर सर्वसामान्य ब्राह्मण कुटुंबात मालेगावला जन्माला आलेले एक मध्यमवर्गीय आहेत. लहानपणापासून भिक्षुकी करून स्वतःचे शिक्षण पूर्ण करून २००७ मध्ये पुण्यात आले. आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर पुणेकर झाले. २००७ ते २०१२ पुण्यात नोकरी करून २०१२ नंतर विमा प्रतिनिधी म्हणून व्यवसाय केला. विश्वविक्रमवीर, मॅन ऑफ एशिया, भारतभूषण, भारतविभूषण, भारतश्री पुरस्काराने सन्मानित झाले. पद्मश्री २०२४ साठी नामांकन प्राप्त झाले. अर्थशास्त्रातील पीएचडी व विमा क्षेत्रातील डिलीटधारक म्हणून संपूर्ण भारतातील एकमात्र विमा प्रतिनिधी अशी ओळख आहे. पुण्यात सिद्धी असोसिएट्स नावाने व्यवसाय आहे. मध्यमवर्गीय विचार मंच, रिद्धी लेडीज विंग आदी संस्थांचे प्रमुख आहेत.

विमा व गुंतवणूक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी व गुंतवणूक प्रतिनिधी मदत करतील?
डॉ संपगावकर यांच्या मते विमा व गुंतवणूक संबंधित क्षेत्रात काम करणारे जवळपास 26 हजार कर्मचारी व प्रतिनिधी हे पुणे लोकसभा मतदारसंघात राहतात ते सर्व त्यांच्यातील पहिला पूर्ण वेळ गुंतवणूक प्रतिनिधी हा खासदार होऊन त्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी सज्ज होत आहे त्यामुळे ते सर्व नक्कीच मदत करतील व त्यांनी प्रत्येकी 15 त्यांचे ग्राहक अथवा मित्र परिवारात डॉक्टर मिलिंद पिंपळगावकर साठी मते मागितली तरी तीन लाख 90 हजार असे चार लाख नव्वद हजाराचा टप्पा पार करणे सहज शक्य होईल