रेकॉल्ड कंपनी विरोधात कामगारांचे सातव्या दिवशीही आंदोलन सुरु

138

खराबवाडी येथील प्रकार

चाकण : वाटर हिटर क्षेत्रातील अग्रगण्य व प्रख्यात असलेल्या खराबवाडी ( ता. खेड ) येथील रेकॉल्ड थर्मो या कंपनीतील तब्बल शंभर कायम कामगारांना कसलीच माहिती न देता कंपनी बंद केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे कंपनी विरोधात कंपनीच्या कामगारांनी गेल्या एक नोव्हेंबर पासुन कंपनी प्रवेशद्वारावर रात्रंदिवस सुरु केलेले आंदोलन आज बुधवारी ( दि. ७ नोव्हेंबर ) सुरुच ठेवण्यात आले आहे.

कंपनीचे उत्पादन व यंत्र कालबाह्य झाल्याचे व कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करत कंपनीला टाळे ठोकल्याचे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कळविले आहे. रेकॉल्ड कंपनीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप दगडे, सरचिटणीस स्वप्नील बारमुख, उपाध्यक्ष संतोष घुले, सतीश येडे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गेल्या आठ दिवसापासून सुरु ठेवण्यात आले आहे. कंपनीने अचानक उत्पादन प्रक्रिया घेण्याचे बंद करून कामगारांना थेट घरचा दाखविल्याने कामगार वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून, कामगार संघटना मध्ये संतापाची लाट उसळली आहे.  कंपनी व्यवस्थापनाने सर्व कामगारांना न्याय द्यावा, या मागणीवर ठाम असलेले कामगार रात्रीच्या वेळेसह येथे थांबून आंदोलन करत असल्याने या भागातील विविध सेवाभावी संघटना व कामगार संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार आंदोलन कर्त्यांनी घेतला आहे.