महाराष्ट्राला मोहवणाऱ्या त्रयींनी सुगंधी झाली ‘ पुण्यभूषण ‘ ची दिवाळी पहाट !

217

‘बालगंधर्व ‘ मध्ये गदिमा, बाबूजी , पुलंना सांस्कृतिक गानवंदना

पुणे : गदिमांची शब्दांची लय, पुलंचा अजरामर विनोद आणि सुधीर फडके  यांच्या अवीट चाली दिवाळीच्या पहाटे भेटीला आल्या… अन् पुणेकर रसिकांना दिवाळी सार्थकी लागल्याची अनुभूती आली !

निमित्त होते त्रिदल, पुणे , पुण्यभूषण फाऊंडेशन, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, तसेच कोहिनूर ग्रुप यांनी आयोजित केलेल्या ‘दिवाळी पहाट ‘ कार्यक्रमाचे !

महाराष्ट्राला मोहवणाऱ्या गदिमा, बाबूजी, पु.ल. या त्रयींच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘तिहाई ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम या ‘दिवाळी पहाट ‘ मध्ये सादर करण्यात आला. या  कार्यक्रमातील सांस्कृतिक कार्यक्रम ‘ आशय सांस्कृतिक ‘ ने प्रस्तुत केले. गदिमा यांचे सुपुत्र आनंद माडगूळकर, पुलंचे भाचे दिनेश ठाकूर, सुधीर फडके यांचे मानसपुत्र मानले जाणारे सूर्यकांत पाठक यांनी आभाळाइतक्या उंचीच्या त्रयींच्या ह्रदयस्पर्शि आठवणी सांगून तो मंतरलेला काळच जणू जागा केला !

शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या ५ संस्थांचा ‘ पक्के पुणेकर सन्मान ‘ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात पुणे नगर वाचन मंडळ,डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स, आर्य संगीत प्रसारक मंडळ, ( श्रीनिवास जोशी ), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,अखिल मंडई मंडळ, ( अण्णा थोरात ), डेक्कन कॉलेज या संस्थांचा समावेश होता.

कृष्णकुमार गोयल, वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, लायन्स क्लब चे रमेश शहा उपस्थित होते. मधुरा वेलणकर , प्रवीण जोशी यांनी निवेदन केले. गदिमा,पुल, बाबुजी या त्रयींची दुर्मीळ ध्वनीचित्रफिती दाखवण्यात आल्या.बाबूजींच्या आवाजातील ‘ ने मजसी ने परत मातृभूमीला ‘ गीत ऐकविण्यात आले.

‘ माझे जीवनगाणे ‘ संजीव मेहेंदळे , स्वरदा गोखले, मंजिरी जोशी यांनी गीते गायली. सांग तू माझा होशील का ? तुझे गीत गाण्यासाठी, ‘त्या तिथे , पलिकडे ‘   विकत घेतला श्याम, का रे दुरावा,    जाळीमंदी पिकली करवंद ‘ ही लावणी, कौसल्येचा राम , एका तळ्यात होते ‘ अशा अनेक सुरेल गीतांची बरसात रसिकांवर झाली.

संजीव मेहेंदळे व स्वरदा गोखले,यांनी गीतरामायणातील ‘ राम जन्मला ‘, ‘ पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ‘  ही गीतेही सादर केली.रमाकांत परांजपे , राजू जावळकर, काटे, माधवी करंदीकर, मंदार यांनी साथसंगत् केली. नेहा मुथीयान यांच्या ‘कथक पाठशाला ‘च्या विद्यार्थिनींनी ‘ ज्योती कलश छलके ,’ ‘इथेच टाकू तंबू ‘ या गीतावर नृत्य सादर केले. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.काका धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले.