कोकणी माणसाच्या हातून मुंबई निसटतेय : खा . आढळराव पाटील

172

७ व्या ‘ ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ चा समारोप | उद्योजकतेची कास धरा

पुणे : ‘मुंबई घडविण्यात कोकणवासियांचा खूप मोठा वाटा असला तरी आज कोकणी माणसाची जागा बिहारी ,राजस्थानी माणसांनी घेतली आहे . मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा वाटून घेत असल्यास तो कमीपणा न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो ‘ असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

७ व्या ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ चा समारोप खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्या उपस्थितीत झाला . यावेळी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी ग्लोबल कोकण फेस्टिव्हल चे संयोजक आणि कोकण भूमी प्रतिष्ठान चे प्रमुख संजय यादवराव हे होते.

हा समारोप कार्यक्रम मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर (लक्ष्मी लाँन ,मगरपट्टा सिटी ,पुणे ) येथे रविवारी सायंकाळी झाला . यावेळी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले ,’वनराई ‘चे अध्यक्ष  रवींद्र धारिया , ‘हिरवळ प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष किशोर धारिया ,फेस्टिव्हल चे सहसंयोजक ‘एक्झिकोन ग्रुप ‘चे प्रमुख एम . क्यू . सय्यद ,उद्योजक रामदास माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

हा फेस्टिव्हल १ ते  ४ नोव्हेंबर २०१४ च्या दरम्यान झाला . कोकणचे उद्योग ,पर्यटन ,कला ,संस्कृती ,स्वयंरोजगार ,कृषी विषयक प्रदर्शन -चर्चासत्रे ,फॅशन शो या फेस्टीव्हल मध्ये आयोजित करण्यात आले होते.

समारोप कार्यक्रमात बोलताना खा . आढळराव म्हणाले ,’कोकणातील सर्व उद्योजकांना एकत्र करून आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल भरवून मोठे ग्लोबल मार्केट संयोजकांनी उपलब्ध करून दिले आहे . हा उल्लेखनीय प्रयत्न आहे . प्रथमपासून भारताची औद्योगिक राजधानी मुंबई वर कोकणी माणसाचे प्राबल्य होते . आता मात्र ही पकड निसटत असून बिहारी ,राजस्थानी माणसाची संख्या वाढत आहे . मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा वाटून घेत असल्यास तो न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो. त्यामुळे आता उद्योजकतेची कास धरली पाहिजे . ‘

‘कोकणाचा विकास होताना शहरात आलेले कोकणवासीय पुन्हा कोकणात जाऊन आपला आणि प्रदेशाचा उत्कर्ष साधतील तो खरा सुदिन म्हणावा लागेल ‘असे प्रतिपादन वनराई ‘ चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी यावेळी बोलताना केले.

‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ च्या निमित्ताने पुण्यात कोकणविषयक काम करणाऱ्या ३०० संस्था एकत्र आल्या ,हे मोठे यश आहे . येत्या मार्च मध्ये १ हजार कोकणी उद्योजकांची परिषद पुण्यात आयोजित केली जाणार आहे ‘ अशी माहिती संजय यादवराव यांनी यावेळी बोलताना दिली.

फेस्टिव्हल मध्ये सहभागी उद्योजक ,कलाकार ,हितचिंतकांच्या सत्कार खा . आढळराव -पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . एम . क्यू . सय्यद यांनी आभार मानले.