विद्यार्थ्यांनी आवडत्या विषयात करीअर करावे

पुणे : “विद्यार्थ्यांनो, पारंपरिक अभ्यासक्रम न निवडता, आपल्या आवडत्या विषयात करिअर करा. आपल्यावर ज्यांनी संस्कार केले, शिक्षण दिले, त्यांचा कधीही विसर पडू देऊ नका,” असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिला. स्वभाषेचे महत्व जपण्याचे आवाहन करत सोलापूरकर यांनी स्वभाषा उत्तम आल्याशिवाय दुसरी भाषा शिकता येत नाही. त्यामुळे वाचन वाढवा, वृत्तपत्रे वाचा आणि आपला इतिहास पुस्तकांतून जाणून घ्या, असे सांगितले.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रातर्फे वसतिगृहनिहाय घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण डॉ. अ. शं. आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. प्रथम तीन विजेत्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचा प्रथम क्रमांक सिंहगड गटाला देण्यात आला. याशिवाय पाचही वसतिगृहातील व्यवस्थापन टीमचा गौरव करण्यात आला. जपानमधील कंपन्यांमध्ये नोकरी मिळालेल्या समितीच्या तीन विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी स्नेहल कुलकर्णीने पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विश्वस्त डॉ. ज्योती गोगटे, विनया ठोंबरे, संजय अमृते, कार्यकर्ते सीमा होस्कोटे, रवींद्र नामजोशी, राजेंद्र ततार, हरीष अष्टेकर, निसार चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह सर्व वसतिगृहांचे पर्यवेक्षक उपस्थित होते. विद्यार्थी प्राजक्ता क्षीरसागर व ओंकार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.