नावीन्यपूर्ण बौद्धिक कल्लोळ

194

पुण्यातील मुठा नदीवरचा उजवा कालवा, जो  नरवीर तानाजी मालुसरे पथाजवळून शहर पार करतो, त्याच्या एका काठाच्या (उत्तरेकडची) भिंतीचा काही भाग सप्टेंबर २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात अचानक कोसळला आणि ५०-१०० क्युसेक्स प्रमाणे वाहणारे पाणी प्रचंड वेगाने तानाजी मालुसरे रस्त्यावर आले, आणि पुढे दांडेकर पूल, जनता वसाहत, सारसबाग पसिरातील वस्त्यात शिरून जनजीवन विस्कळीत झाले, निवासी भयभीत झाले.

घटना घडली आणि सर्व संबंधित यंत्रणांची धावपळ सुरू झाली, आणि त्याचबरोबर सरकारी आणि विरोधी नेत्यांच्या घटना-स्थळी भेटी सुरू झाल्या. पाठोपाठ मुलाखती, मत-प्रदर्शन आलेच, आणि इथेच कुठेतरी एकमेकांना शहाणे/अति-शहाणे/ बेजबाबदार ठरविण्याची स्पर्धा सुरू झाली.

व्यक्ति-स्वातंत्र्य, विचार-स्वातंत्र्य, अभिव्यक्ती-स्वातंत्र्य, पुरोगामित्व, नाविन्याचा शोध (innovation), व्यवस्थापन तंत्र (management techniques) अशा सर्व कसोट्या लावत कोण खरे आणि कोण खोटे याची जाहीर चर्चा सुरू झाली. आणि नेमके येथेच यातील बरीच मंडळी घसरली.

व्यवस्थापन तंत्रातील एक महत्वाचा टप्पा असतो ब्रेन-स्टोंर्मिंग! वाटल्यास आपण याला मेंदू-घुसळण/बुद्धी-मंथन म्हणू या ! म्हणजे एखाद्या विषयावरील चर्चा करताना किंवा यशापयश मीमांसा करताना संबंधितांची मते, कोणताही पूर्वग्रह न बाळगता ऐकून घेणे. आणि मग त्या त्या मताचा किंवा विचाराचा; झालेल्या घटनेवर, पुढल्या कार्यवाहीवर, किंवा अपेक्षित परिणामावर काय आणि कितपत प्रभाव पडतो यानुसार कार्यवाहीची आखणी आणि अंमलबजावणी ठरविली जाते. अर्थातच एकविचाराने किंवा बहुमताने. यासाठी कोणाच्याही मताची अवहेलना केली जात नाही किंवा टर उडविली जात नाही.

पण पुरोगामीत्वाच्या गप्पा मारणारे नेमके हेच विसरले, आणि स्वतःला सोयिस्कर न वाटणार्‍या अशा काही मतांचा जराही विचार न करता, लगेचच धिक्कार करू लागले. विशेष रोख होता तो जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेल्या उंदीर, घुशी, खेकडे यांच्या पोखरणीचा. सर्व माध्यमात यावर ताबडतोब प्रतिक्रिया सुरू झाल्या, आणि अनेकांनी आपल्या जिभा सैल सोडल्या. आता त्याच विचारांना राज्यमंत्री श्री विजय शिवतारे यांनीही उचलून धरले आहे. (पहा म.टा. पुणे, १/१०/२०१८, पृष्ठ २) . याच बरोबर इतरही अनेक विचार पुढे आले आहेत, जसे भरावातून टाकलेल्या केबल्स, कालव्यालगत खणलेल्या विहिरी (पृष्ठ १), आणि अशीच काही अनुमाने व नोंदी. यापैकी कोणतेही कारण पूर्ण विचार व अभ्यास केल्याशिवाय धुडकावता कामा नये हेच या ब्रेन-स्टोर्मिंग तंत्राचे सूत्र आहे. पुणे शहराचा जर्मनीतल्या ब्रेमेन शहराशी जवळचा संबंध आहे, तेथीलही तज्ञांना विचारण्यास हरकत नाही. इझ्राएल सारखा देशही आपला मित्र आहे, आणि जलसंपदा/ संधारण या विषयात प्रगत आहे. आपल्याकडेही विद्यापीठे व तज्ञ आहेतच. तेव्हा या सर्व मतांचा आदर व्हावा, आणि सुयोग्य तोडगा, आणि प्रतिबंधात्मक उपाय योजले जावेत एवढीच अपेक्षा.

याच पद्धतीने कालव्याच्या तळाची स्थिति काय आहे याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे, म्हणजे किती पाणी खडकवासल्या तून निघते आणि किती कुठे पोचते याचा हिशोब करून; मग किती पाणी वाटेत मुरते याचाही अंदाज येईल. यासाठी कालवा कोरडा करून ड्रोन कॅमेरा चे सहाय्याने संपूर्ण लांबीचे चित्रीकरण करावे, म्हणजे सगळे कच्चे  दुवे समोर येऊ शकतील, आणि पुढील कारवाई करणे सोपे जाऊ शकेल. सर्व संबंधित यावर प्रामाणिक भूमिका घेतील, आणि पुण्यातील या अनुभावातून इतरत्रही आवश्यक कारवाई आधीच सुरू करतील अशी आशा बाळगतो. एका सावित्री-पूल घटनेने आता जुन्या पुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोणच बदलून टाकला हे विसरून चालेल का ?

प्रमोद द बापट, पुणे-411009,

९८२३२७७४३९