इंडिया टुडेच्या पत्रकारांविरोधात फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !

157

इंडिया टुडे या वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि कॅमेरामन यांनी सनातन संस्थेचे मुख्यालय असलेल्या सनातन आश्रम, रामनाथी (फोंडा, गोवा) येथील आश्रमाच्या आवारात उभ्या असलेल्या एका साधिकेचे 10 ऑक्टोबर 2018 या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या चित्रीकरण केले. हे चित्रीकरण इंडिया टुडे वृत्तवाहिनीवरून नंतर प्रदर्शितही करण्यात आले. त्यामुळे सनातनच्या साधिका आणि सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे पत्रकार मयुरेश गणपत्ये आणि कॅमेरामन महेश मोरे यांच्या विरोधात फोंडा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये पत्रकार मयुरेश गणपत्ये आणि कॅमेरामन महेश मोरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा, या प्रकरणी पुढील चौकशी करण्यासाठी त्यांना अटक करण्यात यावी, तसेच त्यांच्याकडून मूळ चित्रीकरण जप्त करण्यात यावे, अशा मागण्याही या तक्रारींमध्ये करण्यात आल्या आहेत.

सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारावर आश्रम परिसरात अनुमतीविना छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे यांसाठी मनाई आहे, अशा आशयाचा फलक लावलेला आहे. असे असतांना इंडिया टुडेच्या प्रतिनिधींनी सनातन आश्रमाच्या आवारात उभ्या असलेल्या सनातनच्या साधिकेचे तिला कुठलीही कल्पना न देता दुष्ट हेतूने अवैधरित्या चित्रीकरण केले. इंडिया टुडेचे पत्रकार आणि कॅमेरामन यांनी त्यासाठी आश्रम व्यवस्थापकांची अनुमतीही घेतली नव्हती, असे सनातन संस्थेच्या वतीने प्रविष्ट करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.