बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ ची मोशन पोस्टरद्वारे बंपर घोषणा

162

दिवाळी नंतर २३ नोव्हेंबर रोजी ‘मुळशी पॅटर्न’ बॉक्स ऑफिसवर करणार धमाका

अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेला ‘मुळशी पॅटर्न’ दिवाळी नंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मुळशी पॅटर्न’ ची सध्या तरुणाई मध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे, कारण ‘अराररा खतरनाक’ हे गाणे सुपरहिट झाले आहे. अत्यंत वेगाने व्हायरल झालेल्या, आयटम सॉंगच्याच धर्तीवर बनलेल्या या भाईटम सॉंगला नेटकऱ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, अल्पावधीत तब्बल पंधरा लाखाहून अधिक व्ह्युज या गाण्याला मिळाले आहेत. या गाण्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. त्या नंतर आता अतिशय हटके अंदाजातील मोशन पोस्टरमुळे तरुणाईची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.

‘मुळशी पॅटर्न’ मधून लेखक, दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडले आहे. दिग्दर्शक म्हणून ‘देऊळबंद’ या पहिल्या चित्रपटातून आपले वेगळेपण दाखवलेल्या प्रविण तरडे यांच्या आगामी ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये नेमके काय आहे? हे लवकरच समजेल.

मोशन पोस्टर लिंक : https://www.facebook.com/MulshiPatternFilm/videos/505968766571810/