‘आयस्क्वेअरआयटी’च्या प्रियांकाला पुणे विद्यापीठाकडून तीन सुवर्णपदके

178

पुणे : होप फाउंडेशन संचलित हिंजवडी येथील इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयस्क्वेअरआयटी) महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रियांका सिंग हिने संगणक अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रथम येत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून तीन सुवर्णपदके पटकावली. विद्यापीठाच्या वतीने विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर केली. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या रत्नागिरी येथील फिनोलेक्स अकॅडेमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एफएएमटी) महाविद्यालयानेही अनेक सुवर्णपदके मिळवली, तर येथील ६५ गुणवंत विद्यार्थी विद्यापीठीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

प्रियांका सिंग हिने संगणक अभियांत्रिकी विद्याशाखेत ८५.३३% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ‘डॉ. डी. वाय पाटील’, ‘चि. अमित बहुले’ व ‘जी. एच. रायसोनी’ अशी तीन सुवर्ण पदके तिला मिळाली. तसेच ह्या वर्षीचे कातोनो रमस पुरस्कृत रोख पारितोषिक देखील प्रियांकाने पटकावले. ह्या घवघवीत यशामागे मी केलेले अथक परिश्रम, तसेच माझे पालक, मित्र व शिक्षकांचा माझ्यावर असलेला विश्वास व त्यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य हा आहे; ह्या यशाचे श्रेयदेखील ह्याच सर्व लोकांचे आहे असे मनोगत प्रियांकाने ह्यावेळी व्यक्त केले. सध्या प्रियांका पदव्युत्तर शिक्षण घेत आहे, पदव्युत्तर शिक्षणानंतर ‘संगणकीय अभियांत्रिकी’ विद्याशाखेतच संशोधन करण्याचा तीचा मानस आहे.

अरुणा कटारा म्हणाल्या, “शैक्षणिक गुणवत्तेची प्रतिभा उंचावायची असेल तर योग्य पोषण व विविध स्तरीय संधी विद्यार्थांना उपलब्ध दिल्या पाहिजेत, असा विश्वास फिनोलेक्स कंपनी समूह व होप फौन्डेशन आणि रिसर्च सेंटरचे संस्थापकीय अध्यक्ष प्रल्हाद छाब्रिया यांनी ‘आयस्क्वेअरआयटी’ आणि ‘एफएएमटी’ या संस्थांच्या स्थापनेवेळी व्यक्त केला होता. तो विश्वास या दोन्ही संस्था सार्थ ठरवत आहेत, याचा अभिमान वाटतो. येथील विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकताहेत, ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.”