सरकारच्या आश्वासनानंतरही शेतकरी ठाम

173

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर विचार केला जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्यानंतरही राजधानी दिल्लीच्या वेशीवर धडकलेले हजारो शेतकरी आंदोलनावर ठाम असून सरकारचे आश्वासन आम्हाला मान्य नाही, आमचे आंदोलन सुरूच राहणार, असे शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी निक्षून सांगितले.

शांततेच्या मार्गाने दिल्लीकडे कूच करणाऱ्या किसान क्रांती यात्रेवर आज दिल्लीच्या वेशीवर गाझीपूर येथे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठ्या चालवतानाच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. गांधी जयंतीदिनीच घडलेल्या या घटनेने सर्व स्तरांतून त्याचा निषेध होत असताना सरकारने शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सुरेश राणा यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकरी नेत्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन शेखावत यांनी यावेळी दिले. मात्र, या आश्वासनाने शेतकऱ्यांचे समाधान झालेले नसून भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी सरकारचे आश्वासन आम्हाला मान्य नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा दिला आहे. किसान युनियनचे प्रवक्ते युद्धवीर सिंह यांनीही ४ प्रमुख मागण्यांबाबत आश्वासन मिळालेले नाही, असे नमूद केले.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
१. ६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना पेन्शन द्यावे.
२. पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करावा.
३. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी.
४. सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा द्यावा.
५. किसान क्रेडिट कार्डावर बिनव्याजी कर्ज द्यावे.
६. वन्यप्राण्यांपासून शेतीला संरक्षण मिळावे.
७. संपूर्ण शेतीमालाच्या खरेदीची हमी हवी.
८. स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी.
९. ऊसाची किंमत वेळीच अदा करण्यात आली नाही तर त्यावर व्याज मिळावे.
१०. ऊसाचा भाव लवकरात लवकर चुकता करावा.