नाणेकरवाडीत वाद्यांच्या गजरात बाप्पांना निरोप

160

चाकण (अशोक टिळेकर) : गणपती बाप्पा मोरया…मंगल मूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या….एक…दोन…तीन…चार…गणपतीचा जयजयकार…असा जयघोष करत, तसेच ढोल ताशांच्या निनादात, टाळ मृदंगासह वाद्यवृंदाच्या गजरात गेल्या दहा दिवसांपूर्वी वरुणराजाचे बोट धरून आलेल्या गणपती बाप्पांना उद्योग पंढरीतील नाणेकरवाडी सह मेदनकरवाडी ( ता. खेड ) परिसरात येथील गणेशभक्तांनी तसेच कार्यकर्त्यांनी जड अंतकरणाने निरोप दिला.

गेल्या दहा दिवसांपूर्वी मुसळधार पावसात वरुणराजाचे बोट धरून आलेल्या बाप्पांची येथील उद्योग पंढरीतील नाणेकरवाडी सह या भागातील खराबवाडी व मेदनकरवाडी परिसरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांनी मोठा जल्लोष करत मोठ्या भक्ती भावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा केली होती. पावसाने उघडीप दिल्याने गणरायाला निरोप देताना येथील गणेशभक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता. भाविकांसह टाळ मृदुंगाचा गजर, उंट, घोडे आदींची जोरदार भव्य मिरवणुकीने फुलून गेलेल्या या भागातील रस्त्यांवर केवळ गणेशभक्तच दिसत होते. कामगार व गणेशभक्तांनी यावर्षी नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी तसेच पुणे – नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी हद्दीतील शहा पेट्रोल पंपाजवळील शंभूराजे प्रतिष्ठान व सिद्धेश्वर तरून मंडळाने यंदा गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली होती. युवा उद्योजक अरुण कुसाळकर व माजी उपसरपंच सतीश विटकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या बाप्पांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाप्पांना निरोप देताना टाळमृदुंगासह, वाद्यवृंदासह भजनाचे आयोजन केले होते. कार्यकर्ते, भाविक व ग्रामस्थ मंडळीनी टाळमृदंगाचा गजर करून अवघा परिसर भक्तिरसात चिंब केला होता. त्यानंतर मोशी येथील पवित्र इंद्रायणी नदीमध्ये बाप्पांना रात्री उशिरा निरोप देण्यात आला.