श्राद्धकर्मातील काही कृतींमागील अध्यात्मशास्त्र

182

श्राद्धातील विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र या लेखातून आपण जाणून घेऊ. यांतून श्राद्ध या धार्मिक कृतीचे श्रेष्ठत्व आपल्याला लक्षात येईल.

देवकार्यात निषिद्ध मानलेल्या चांदीच्या वस्तू श्राद्धात का वापराव्यात ?

पूजाकार्यात निषिद्ध मानलेल्या चांदीतील रजोगुण आणि वायूतत्त्व यांमुळे पितरांना नैवेद्य लवकर ग्रहण करता येत असल्यामुळे चांदीच्या वस्तू श्राद्धात वापरणे.

सौवर्णं राजतं वाऽपि पितृणां पात्रमुच्यते । – मत्स्यपुराण, अध्याय 17, श्‍लोक 20

अर्थ : पितरांशी संबंधित विधींसाठी सोन्याचे किंवा चांदीचे पात्र वापरावे.

शिवनेत्रोद्भवं यस्मात् तस्मात् तत्पितृवल्लभम् । अमङ्गलं तद्यत्नेन देवकार्येषु वर्जयेत् ।्।

– मत्स्यपुराण, अध्याय 17, श्‍लोक 23

अर्थ : चांदी शंकराच्या तृतीय नेत्रापासून उत्पन्न झालेली असल्याने ती पितृकार्यासाठी प्रशस्त आहे. परंतु देवकार्यासाठी ती अशुभ असल्याने या कार्यांत चांदीची पात्रे प्रयत्नपूर्वक वर्ज्य करावीत.

अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण : चांदीमध्ये सत्त्वगुण 50 टक्के, रजोगुण 40 टक्के आणि तमोगुण 10 टक्के आहे. चांदीमध्ये वायूतत्त्वही अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे चांदीच्या वस्तूंचा वापर करतांना रजोगुण वाढल्याने पितरांना चांदीच्या पात्रात ठेवलेला नैवेद्य लवकर ग्रहण होतो. अशा प्रकारे पितरांना चांदीचा लाभ होतो. मात्र देवकार्य करतांना रजोगुण वाढलेल्या चांदीच्या साहित्याचा वापर केल्यास देवकार्यातून निर्माण होणार्‍या सात्त्विकतेचा लाभ सर्वांना होत नाही. त्यामुळे देवकार्यात चांदीचा वापर टाळावा.

– कु. मधुरा भोसले, सनातन संस्था

(श्राद्धविधीमध्ये सोने किंवा चांदी यांपासून बनवलेली उपकरणे वापरू शकतो. सध्याच्या काळात सर्वसाधारण मनुष्याला सोन्याची उपकरणे वापरणे व्यावहारिक दृष्टीने तेवढे शक्य नसते. त्यामुळे येथे चांदीविषयीचे शास्त्र प्रामुख्याने दिले आहे. – संकलक)

श्राद्धात रांगोळीच्या भुकटीने रांगोळी का काढू नये ?

रांगोळी काढणे, हे शुभविधीतील शुभचिन्हाचे प्रतीक मानले जाते. रांगोळी काढणे, म्हणजे एक प्रकारे देवतांकडून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींचे स्वागत करून त्यांना आवाहन करणे होय. रांगोळीच्या माध्यमातून हिंदु धर्म आपल्याला देवतांच्या पूजेसारख्या शुभविधीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींचे स्वागत करण्यास शिकवतो. पितृकर्म करतांना मर्त्यलोकातून वातावरणाच्या कक्षेत येणार्‍या लिंगदेहांच्या माध्यमातून वातावरणात रज-तमात्मक लहरी प्रक्षेपित होत असतात. म्हणून या रजतमयुक्त अशुभ विधीचे द्योतक म्हणून हे कर्म करतांना रांगोळी काढणे त्याज्य मानतात.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन संस्था

श्राद्धामध्ये रांगोळी भस्माने का काढावी ?

श्राद्धविधीमध्ये भस्माने रांगोळी काढल्याने भस्मातून प्रक्षेपित होणार्‍या  तेजतत्त्वात्मक लहरींच्या प्रभावामुळे पितरान्नाचे, म्हणजेच पितर संतुष्टीसाठी त्या त्या स्तरावर अर्पण करण्यात येणार्‍या हविर्भागाचे वाईट शक्तींपासून रक्षण होते आणि पितरांना तो तो हविर्भाग कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता ग्रहण करणे शक्य झाल्याने पितर अल्पावधीतच संतुष्ट होण्यास साहाय्य होते. – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

देवपूजेतील कृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि त्याच कृती श्राद्धात उलट दिशेने का कराव्यात ?

देवकर्मात सर्व विधी देवतेला आवाहन करण्यासाठी असतात, तर पितृकर्मात प्रत्येक विधी पितरांना आवाहन करण्यासाठी केला जातो. त्या दृष्टीने दर्भाच्या साहाय्याने त्या त्या गोष्टीवर पाणी शिंपडून संकल्प केला जातो. त्या त्या तत्त्वाच्या लहरींच्या गतीला पूरक अशा दिशेत कर्म केले असता, त्याची फलप्राप्ती जास्त असते. देवकर्म करतांना देवतांना आवाहन केले असता, ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या त्या त्या देवतांच्या लहरींचे देवयान मार्गाने पृथ्वीकक्षेत आगमन होते. सात्त्विक चैतन्यमय लहरींचे भ्रमण नेहमी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजेच सुलट दिशेने असल्याने देवकर्म करतांना नेहमी पाण्याच्या साहाय्याने सुलट मंडल काढून किंवा सुलट प्रदक्षिणा घालून त्या त्या देवतांच्या लहरींचे आवाहनात्मक स्वागत केले जाते. यालाच प्रदक्षिण कर्म असे म्हणतात. याउलट पितृयानातून पृथ्वीच्या कक्षेत आगमन करणारे पितर हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने कार्यरत असलेल्या रज-तमात्मक लहरींच्या साहाय्याने श्राद्धस्थळी येतात; म्हणून त्या त्या दिशेला पूरक असे कर्म त्या त्या पिंडावर किंवा पितरांशी संबंधित गोष्टींवर उलट्या दिशेने पाण्याचे मंडल काढून किंवा पाणी शिंपडून संकल्प सोडून केले जाते. यालाच अप्रदक्षिण कर्म असे म्हणतात. – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण देवस्थानी पूर्वाभिमुख आणि पितृस्थानी उत्तराभिमुख बसण्यामागील शास्त्र काय ?

पूर्व-पश्‍चिम दिशेत क्रियालहरी घनीभूत झालेल्या असतात. (ज्ञानलहरी, इच्छालहरी आणि क्रियालहरी या ब्रह्मांडातील तीन प्रमुख लहरी आहेत. – संकलक) श्राद्धातील मंत्रोच्चाराने या लहरींना गती प्राप्त होते. या दिशेला तोंड करून बसलेल्या ब्राह्मणांनी केलेले कर्म त्या त्या दिशेकडे आकृष्ट होणार्‍या देवतांच्या सात्त्विक लहरींमुळे लवकर संकल्पसिद्ध झाल्याने फलनिष्पत्तीचे प्रमाणही जास्त असते. पितरांचे पृथ्वीकक्षेत आगमन होण्यास यमलहरींचा प्रवाह पोषक असतो. इतर दिशांच्या मानाने उत्तर-दक्षिण दिशेत तिर्यक लहरी, तसेच यमलहरी यांच्या संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पितृस्थानी मानल्या गेलेल्या ब्राह्मणांना दिलेले दान अल्प कालावधीत पूर्णत्वास जाते. यासाठी देवस्थानी मानलेले ब्राह्मण पूर्वाभिमुख, तर पितृस्थानी मानलेले ब्राह्मण उत्तराभिमुख बसवतात. – (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

श्राद्धविधीतून होणारा लाभ

अ. यजमानाला होणारा लाभ : ब्राह्मणांच्या माध्यमातून देवता आणि पितर यांची तृप्ती झाल्याने यजमानाला आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच यजमानाला होणारा पूर्वजांचा त्रास न्यून होतो आणि त्याच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचा त्रासही घटतो. वासनांची तृप्ती झाल्याने पितरांना पुढील गती प्राप्त होते.

आ. अन्न ग्रहण केल्यावर देव-ब्राह्मणाला होणारे लाभ : श्राद्धविधीमध्ये दोन प्रकारचे ब्राह्मण असतात. एक देव-ब्राह्मण आणि दुसरा पितर-ब्राह्मण. निवेदन केलेले अन्न ग्रहण केल्याने देव-ब्राह्मणाला अधिक प्रमाणात शक्तीची (सत्त्वप्रधान) स्पंदने (शक्तीस्वरूपात ऊर्जा) प्राप्त होतात. या ब्राह्मणाच्या माध्यमातून गंधस्वरूपात देवलोकातील देवताही अन्न ग्रहण करतात.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र’

संपर्क : 9225639170