मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलवायचाय? मग फॉलो करा या स्टेप्स

नवी दिल्ली | 21 March 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आतूर झाला आहे. वोटर आयडी हा कोणत्याही भारतीय नागरिकासाठी एक महत्वाचा पुरवा आहे. मतदानावेळी पुरावा म्हणून हे ओळखपत्र उपयोगी ठरते. तर इतर ठिकाणी पण ते उपयोगी पडते. मतदान ओळखपत्र अद्ययावत असणे गरजेचे आहे. तुम्हाला मतदान ओळखपत्रावरील फोटो आवडला नसेल तर तो सहज बदलता येतो. त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. या सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलवू शकता.

मतदार यादीत असे तपासा तुमचे नाव

मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? हे कसं माहिती करुन घेणार, तर एकमद सोपं आहे. तुम्हाला ही यादीच तपासावी लागेल. त्यासाठी सर्वात अगोदर तुमचा फोन वा लॅपटॉपच्या मदतीने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जा. याठिकाणी एक नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. Search by Details, Search by EPIC and Search by Mobile या आधारे तुम्ही नाव तपासू शकता.

मतदान ओळखपत्रावरील बदला फोटो

मतदान ओळखपत्रात अनेकदा फोटो चांगला दिसत नाही. कॅमेऱ्याची लो क्वालिटी, फोटो छोट्या चौकटीत बसवताना तो कम्प्रेस करण्यात आल्याने तो ओळखपत्रावर अंधूक अथवा काळपट दिसतो. तो व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला हा फोटो घरबसल्या या सोप्या पद्धतीने बदलता येतो.

मतदान ओळखपत्रावरील फोटो असा बदलवा

  • सर्वात अगोदर नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टलवर https://www.nvsp.in/ जा

  • येथे Correction In Voter ID चा पर्याय मिळेल, यावर क्लिक करा

  • तुम्हाला वोटर मित्र चॅटबॉट पाठविण्यात येईल

  • तुमचा मतदान ओळखपत्र क्रमांक मागण्यात येईल. तो जमा करा.

  • तुमच्याकडे Voter ID Number नसेल तर वोटर आयडी क्रमांक नाही, यावर क्लिक करा

  • त्यानंतर इलेक्टोरल रोलचा तपशील द्यावा लागेल

  • तुमच्या मतदार संघातील मतदान ओळखपत्राची यादी समोर येईल. त्यात वोटर आयडी निवडा.

  • येथे तुम्हाला मतदान ओळखपत्रात बदल का करायचे याचे कारण नमूद करावे लागेल.

  • त्यानंतर योग्य ती माहिती भरून आधार क्रमांक नोंदवावा लागेल.

  • फोटो बदलण्यासाठी नवीन फोटो अपलोड करावा लागेल.

  • त्यानंतर Continue पर्यायावर क्लिक करा

  • सर्वात शेवटी एक रेफरेंस क्रमांक समोर येईल. तो जपून ठेवा.

  • हा क्रमांक तुम्हाला स्टेट्स चेक करण्यासाठी उपयोगी ठरेल.

  • त्यानंतर काही वेळातच तुमचा फोटो वोटर आयडीवर अपडेट होईल.