५ हजार कोटींचा चुना लावून गुजरातचा व्यापारी सहकुटुंब परदेशात परागंदा

154

नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी बँकांना हजारो कोटींचा चुना लावून पळालेले असताना असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीचा मालक नितीन संदेसरा ५ हजार कोटी घेऊन परदेशात पळाल्याचे वृत्त आहे.
काही मुख्य संस्थाच्या माहितीनुसार तो दुबईत दडून बसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता तो युएईमध्ये नसून नायजेरियामध्ये लपलेले असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्यासोबत त्याचा भाऊ चेतन संदेसरा, भावजयी दिप्तीबेन संदेसरा आणि कुटुंबातील अन्य सदस्यही परदेशात पळाले आहेत. हे सर्वजण नायजेरियात लपल्याची माहिती आहे. भारत आणि नायजेरिया या दोन देशांत प्रत्यर्पणासंबंधी करारच नसल्याने संदेसराला भारतात परत आणणे कठीण आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नितीनला दुबईतून ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. मात्र, ही माहिती चुकीची आहे. नितीन संदेसरा याला ताब्यात घेण्याआधीच तो सहकुटुंब नायजेरियात पळून गेला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

तथापि, तपास एजन्सींनी युएई अधिकाऱ्यांना संदेसरा आढळून आल्यास त्याला ‘तात्पुरती अटक’ (प्रोव्हिजनल अॅरेस्ट) करावी, अशी विनंती केली आहे. तसेच, त्याच्याविरोधात ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करावी, यासाठी इंटरपोलकडे प्रयत्न सुरू आहेत. संदेसरा भारतीय पासपोर्टवर नायजेरियाला पळाला किंवा त्याने इतर कोणत्या देशाच्या कागदपत्रांचा वापर केला, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.

सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालय (ईडी) ने स्टर्लिंग बायोटेकचे गुंतवणूकदार नितीन, चेतन आणि दिप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाउंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेंचे माजी संचालक अनुप गर्ग आणि अन्य काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.