नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीवर बलात्कार

157

आळंदी फाट्यावरील वनहद्दीतील प्रकार : अवैध वाहनचालकाचे अमानुष कृत्य : वाहतूक कोंडी असल्याचा केला बनाव

चाकण (अशोक टिळेकर ) : उद्योग पंढरीतील कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधासाठी निघालेल्या तरुणीवर मोटार कारचालकाने रस्त्यात वाहतूक कोंडी असल्याचा बनाव करून व सबंधित वाहन आडमार्गे नेवून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याची व माणुसकीला काळिमा फासण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका स्रीलंपट दिवट्यावर येथील पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे अवैध प्रवाशी वाहन चालकाकडून भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेबाबत चाकण पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.

बलात्कार प्रकरणी तीस वर्षीय पिडीत तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून मंगेश आगळे ( वय – ३० वर्षे ) या नराधमा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत तरुणी ही बुधवारी ( दि. १२ सप्टेंबर ) सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान पुणे – नाशिक महामार्गावरील मोशी ( ता. हवेली, जि. पुणे)  येथून चाकण जवळील वाकीतील भाम ( ता. खेड) गावच्या हद्दीतील टाटा नावाच्या कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी गेली होती. दुपारच्या वेळी जाताना तिने आळंदी फाटा ते भाम हा प्रवास खासगी ओमोनी मोटार कार मधून केला. काम शोधून परत घरी येत असताना भाम ( ता. खेड ) बस स्टॉपवर तीच ओमिनी मोटार कार तिला दिसली. त्यामुळे त्या तरुणीने ओमिनी चालकाला तुम्ही मोशीला जाणार का, असे विचारले. त्यावर चालकाने होकार दर्शविला.

तरुणी ओमिनी चालका शेजारी पुढच्या सीटवर बसली. चालत्या प्रवासात तरुणी आणि मोटार चालक यांचे बोलणे झाले. दरम्यान, त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांकही चालत्या गाडीत घेतले. गाडीतील सर्व प्रवासी चाकण गावापूर्वीच उतरले. ओमिनी मोटार चालक मंगेश याने डाव साधत आळंदी फाट्यावर वाहतूक कोंडी असल्याचा बनाव करत आपण थेट आळंदी मार्गे पुढे मोशीला जाऊ, असे त्या तरुणीला सांगून आळंदी फाट्यापासून पुढे काही अंतर जाताच वन हद्दीतील जंगलात एका तळ्याच्या शेजारी मंगेशने गाडी आडमार्गे घेतली. सबंधित तरुणीला संशय आल्याने तिने याबाबत चालकाला विचारणा करून मोठमोठ्याने आरड ओरडा केला. त्यावर चालकाने तरुणीला चाकूचा धाक दाखविला. त्यामुळे तरुणी जबरदस्त घाबरली. याचा फायदा घेवून मोटार चालकाने त्या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिला निर्जन भागात सोडून पोबारा केला.

सबंधित पिडीत तरुणीने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी मंगेश आगळे या नराधमावर पाशवी   बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.