शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दोन भामट्यावर गुन्हा दाखल

134

खराबवाडी येथील प्रकार

चाकण (अशोक टिळेकर) : शरीर सुखाची मागणी करून सत्तावीस वर्षीय विवाहितेशी अत्यंत अश्लील हावभाव करून व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण नजीक असलेल्या खराबवाडी येथील वाघजाईनगर व आळंदी फाटा ( ता. खेड ) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी सबंधित विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी गुरुवारी ( दि. १३ सप्टेंबर ) राणूबाईमळा येथील दोन भामट्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सचिन वरपे व चेतन शहा ( दोघेही रा. सहारा ओरचीड सोसायटी, राणूबाईमळा, ता. खेड ) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन टग्यांची नावे आहेत. सबंधित सत्तावीस वर्षीय विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सबंधित विवाहिता ही मुळची चाकण येथील मार्केट यार्ड जवळ रहाणारी आहे. कामानिमित्त ती  खराबवाडी येथील वाघजाईनगर येथील मयूर इंडस्ट्रीज प्रा.लि. या कंपनीत कामाला जात होती. त्यामुळे कामाच्या माध्यमातून तिची सचिन व चेतन यांच्याशी ओळख झाली होती. मात्र, या दोन टग्यांनी ओळखीचा गैरफायदा घेत मागील १ जुलै, ते १२ सप्टेंबर, २०१८ या अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत सबंधित विवाहिता कंपनीत कामावर असताना तिच्याशी गैरवर्तन केले. सचिन याने मयूर या  कंपनीत व आळंदी फाटा येथील पांचाली हॉटेल मध्ये तसेच त्याच्या राहत्या घरी विवाहीतेकडे शरीर सुखाची मागणी केली. तसेच तिचा उजवा हात धरून जवळ ओढून अत्यंत अश्लील हावभाव करत तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत तिचा विनयभंग केला. त्याचप्रमाणे चेतन शहा याने मागील काही दिवसांपूर्वी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान संबधित विवाहिता जेवण करीत असताना तीच्या शेजारी बसून तिचा डावा हात धरून तू माझे का ऐकत नाही. असे म्हणून तिचा विनयभंग केला. वारंवार होत असलेल्या या अत्याचाराला वैतागून सबंधित विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी सचिन वरपे व चेतन शहा या दोन भामट्यावर गु.र.नं.८१२/२०१८ नुसार, भा.द.वि.कलम ३५४ ( अ ) व ( ड ) अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार, अनिल ढेकणे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.