२०११ पेक्षा २०१८ मध्ये आर्थिक स्थिती अत्यंत वाईट; काँग्रेसचा पलटवार

146

नवी दिल्ली : देशभरात महागाई व पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरोधात जनआक्रोश सुरू असताना सरकारने मात्र इंधन दरवाढीवरून हात वर केले आहेत. दरवाढीचे नियंत्रण आमच्या हाती नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीमुळे भाव वाढत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला २१ पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर सोमवारी देशभरात लोक रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी बंद शांततेत पाळला गेला तर काही ठिकाणी हिंसक वळण मिळाले. या बंदच्या आयोजनात विरोधी पक्षांची दिसलेली एकजूटही तेवढीच महत्त्वाची ठरली. विरोधकांच्या आरोपांच्या विरोधात सरकारचा बचाव करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरविण्यात आले. मोदी सरकार अनेक विकास योजना राबवत असून त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर पेट्रोल, डिझेलच्या किमतीतील चढ-उतार अवलंबून असतात, असे सांगून त्यांनी या किमती कमी करण्याबाबत हात वर केले. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी कोणते उपाय योजता येतील याबाबत धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी चर्चा केली.

या पक्षांची मिळाली साथ : काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, जनता दल (सेक्युलर), बसपा, राजद, भाकप, माकप, एआयडीयूएफ, नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा, द्रमुक, टीएमसी, आम आदमी पार्टी, पीडीपी, केरळ काँग्रेस, आरएफसी, आययूएमएल, लोकतांत्रिक जनता दल, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, हिंदुस्थान आवाम पार्टी आदी पक्षांनी पाठिंबा दिला होता. देशभर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले आहेत, मात्र पंतप्रधान नेहमीप्रमाणे सोयीस्कररीत्या गप्प बसले आहेत. ते कोणत्या जगात राहतात, हेच समजत नाही.