Pune Prahar : मॉलला परवानगी, जिमला का नाही?

51

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू लागडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल होत आहे. नुकतेच लॉकडाऊनचे आणखी काही निर्बंध कमी करण्यात आले. यानुसार देशात जिमला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रात जिम सुरु करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जिम मालक आणि ट्रेनर चांगलेच वैतागले आहेत. अगदी बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मराठमोठा ट्रेनर मनीष आडविलकर यानेही नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे.

मनीष आडविलकर म्हणाले, “सुरुवातीला लॉकडाऊन समजू शकतो. मात्र, आज त्या गोष्टीला 5 महिने संपून सहावा महिना सुरु झाला आहे. इथं लाखो जिम आणि लाखो कामगार आहेत. जिम बंद असेल तर जिममध्ये वेगवेगळी कामं करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे पगार कोठून येणार? अनेक जिम मालकांनी तर कर्ज काढून जिम सुरु केल्या आहेत. त्यांचे कर्जाचे हप्ते आणि इतर गोष्टींचं कसं होणार? शेवटी सरकारला काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागेल. हे पुढे कसं न्यायचं यावर निर्णय घ्यावा लागेल. जिममध्ये काम करणाऱ्या ट्रेनर आणि इतर कर्मचाऱ्यांची उपासमार सुरु आहे. हे गंभीर आहे.”

सलमान खानचे ट्रेनर मनीष आडविलकर आणि इंटरनॅशनल बॉडीबिल्डर समीर दाबीलकर यांनी सरकारच्या जिम बंदीच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली. मॉलला परवानगी दिली जाते. सलूनला, ट्रेनला परवानगी दिली जाते. बाजार सुद्धा भरतो आहे. मग आरोग्यासाठी इतक्या महत्त्वाच्या जिमला परवानगी का नाही? जिमला देखील परवानगी द्यावी, अशी मागणी या बॉडीबिल्डर्सने केली आहे. सरकारने जिम सुरु करण्यास तात्काळ परवानगी न दिल्यास त्यांनी आंदोलनालाचाही इशारा दिला आहे.

देशात जिमला परवानगी देण्यात आली. मग महाराष्ट्रात जिमला परवानगी का नाही? असा प्रश्न राज्यातील जिम मालक विचारत आहेत. लाखो रुपये भांडवल आणि लाखो रुपयांचं भाडं भरुन जिम मालकांवर आर्थिक संकट सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोसळलं आहे. त्यामुळे सरकारने आमचाही विचार करावा, अशी मागणी हे जिम मालक करत आहेत.