Pune Prahar : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत ‘नागपंचमी’ची पूजा कशी करावी ?

39

सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. यामुळे हिंदूंचे विविध सण, उत्सव, व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म.

या काळातच नागपंचमी येत असल्याने संपत्कालात सांगितलेल्या पद्धतीने या वेळी हा सण जेथे सामूहिक रूपाने साजरा केला जातो, तेथे तो त्याप्रकारे साजरा करता येणार नाही. या दृष्टीने प्रस्तुत लेखात सध्याच्या दृष्टीने धर्माचरण म्हणून नागपंचमी कशी साजरी करता येऊ शकेल, याचा विचार करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे यातून शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व अधोरेखित होते.

‘आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा’, यासाठी प्रती वर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या वर्षी 25.7.2020 या दिवशी नागपंचमी आहे. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते.

जेथे स्थानिक ठिकाणी असलेल्या वारूळाची सामूहिकरित्या पूजा केली जाते, परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने तेथे लॉकडाऊन आहे, तेथे वारूळाची पूजा करणे शक्य होणार नाही. तसेच जेथे लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ आदी सर्व नियम पाळून वारूळाची परंपरागत पूजा व्यक्तीगतरित्या करणे शक्य आहे, तेथे नेहमीप्रमाणे पूजा करण्यास हरकत नाही. जेथे सामूहिकरित्या पूजा करणे अथवा घराबाहेर पडून वारूळाचे पूजन करणे शक्य नाही, त्याचा या लेखात प्रामुख्याने विचार केला आहे.

1. नागदेवतेचे पूजन करताना करावयाच्या कृती 

1 अ. नागदेवतेचे चित्र काढणे : हळदमिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे (अथवा नऊ नागांची चित्रे काढावीत.) आणि त्या ठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे. ‘अनंतादिनागदेवताभ्यो नमः ।’ हा नाममंत्र म्हणत गंध, पुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे.

1 आ. षोडशोपचार पूजन : ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य आहे, त्यांनी षोडशोपचार पूजा करावी.

1 इ. पंचोपचार पूजन : ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी आणि दूध, साखर, लाह्या यांचा, तसेच कुळाच्या परंपरेनुसार खीर इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. (पंचोपचार पूजा : गंध, हळद-कुंकू, पुष्प (उपलब्ध असल्यास दूर्वा, तुळशी, बेल) धूप, दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे.)

2. पूजनानंतर नागदेवतेला करावयाची प्रार्थना ! 

‘हे नागदेवतांनो, श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे, या पूजनाने नागदेवता प्रसन्न होऊन मला नेहमी सुख देणार्‍या होवोत. हे नागदेवतांनो, मी हे जे पूजन केले आहे, त्यात अज्ञानाने वा अजाणतेपणी काही उणे-अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी. तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथ पूर्ण होवोत. माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’ – श्री. दामोदर वझे, संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, गोवा.

संकलक – प्रा. विठ्ठल जाधव | संपर्क क्रमांक  – ७०३८७१३८८३