Pune Prahar : हवेलीत जागेच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण

224

पुणे : (ॲड-सुचिता भोसले) हवेलीतील दक्षिण भागात जागेच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर शेतकरी व बिल्डर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.

हवेलीतील फुरसुंगी परिसरातील भागात जागेच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी तर ओढ्यावर सिमेंटच्या नळ्या टाकून पुल व सिमेंटचे पक्के रस्ते बनवले आहेत. काही ठिकाणी ओढे-नाल्यांत भराव टाकून त्यांचे अस्तित्वच संपवले जात आहे. यातून पावसाळ्यात अनेक धोके संभवत असून, प्रशासकीय पातळीवर मात्र याबाबत उदासीनता आहे.

मंतरवाडी ते फुरसुंगी व कामठे मळा, कवडीपाट टोल नाका या भागातील ओढ्या नाल्या लगत ठिकठिकाणी अनेक व्यावसायिकांनी प्लाॅटींग,बिंलडींग असे व्यवसाय थाटले आहेत. व्यावसायिकांकडून सर्रास नैसर्गिक ओढे-नाले यांचा मार्ग बदलणे, भराव टाकणे अशा प्रकारची कामे होत असतात. अनेक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण आहे. त्यामुळे ओढ्यांच्या पात्राची रुंदी कमी झाली आहे. पावसाळ्यात येणारे पाणी वाहून जाण्यासाठी जागा राहत नाही.

हवेली तालुक्यातील डोंगरांमधून येणारे पावसाचे पाणी ओढे-नाल्यांमधून वाहत असते. प्रशासनाने यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी मोऱ्यांची व्यवस्था केली आहे. या मोऱ्यांमधून पाणी पुढे वाहत असते. पण, काही वर्षात धनदांडग्यांनी व व्यावसायिकांनी जमिनी खरेदी करून वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत.

अनेकांनी जागेच्या हव्यासापोटी ओढे-नाल्यांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अतिक्रमणे केली आहेत. जागा बळकावल्यामुळे ओढे-नाल्यांच्या पात्रांची रुंदी कमी झाली आहे. यातूनच मागील वर्षी पावसाच्या पाण्यामुळे खुप नुकसान झाले होते. रस्त्याच्या तीन-चार फूट उंचीवरून पावसाचे पाणी वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहात काही दुचाकी वाहने रिक्षा वाहून गेल्या होत्या.

हा निसर्गाचा कोप नव्हता, तर मानवनिर्मित चुकांमुळे ओढवलेला प्रसंग होता, हे शासनाच्या लक्षात येत नाही. महसूल विभाग, तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायती यांचे आर्थिक लागेबंध असल्याने या अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई होत नाही, अशी नागरिक तक्रार करतात.

शासनाकडून कारवाई होते, ती फक्त नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी. सर्व्हे करून ओढे-नाल्यांची हद्द कायम केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पण, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या पावसाळ्यातही मागील वर्षी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होईल, अशी लोकांकडून भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने गंभीरतेने याविषयी निर्णय घेऊन अतिक्रमणे काढावीत व ओढे-नाल्यांची हद्द कायम करावी, अशी लोकांकडून मागणी होत आहे. या अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आजूबाजूच्या घरात पाणी शिरून पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.