Pune Prahar : पूर्व हवेली महिनाअखेर पर्यंत लॉकच

528

20 गावांचा समावेश : नियम तोडणाऱ्यांवर कारवाई

लोणी काळभोर : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील लॉकडाऊन गुरुवारी मध्यरात्रीपासून हटवले जाणार आहे. हवेली तालुक्‍यातील करोनाग्रस्त वीस ग्रामपंचायत हद्दीत कंटेन्मेंट (प्रतिबंधित क्षेत्र) झोन मात्र दि. 31 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे 20 ग्रामपंचायत हद्दीत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवहार महिनाअखेर बंदच राहणार आहेत.

हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर म्हणाले की, कंटेनमेंट झोन लागू असलेल्या हवेली तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायत हद्दीत जुलैअखेर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास या ग्रामपंचायत हद्दीतील कंटेन्मेंट झोन हटवून सर्व प्रकारचे व्यवहार पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीत कंटेन्मेंट झोनच्या नियमांचे उल्लघंन करण्याचा प्रयत्न झाल्यास, संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहेत.

लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, वाघोली, कुंजीरवाडी, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, न्यू कोपरे, खानापूर, शेवाळवाडी, गुजर-निबांळकरवाडी, खडकवासला, किरकटवाडी, पिसोळी, वडाचीवाडी, भिलारेवाडी, नांदेड, मांजरी खुर्द, कोंढवे-धावडे व देहू आदी हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दि. 8 पासून कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. याच दरम्यान जिल्हा प्रशासनाने पुणे शहर व पिंपरी-चिंचवडसह हवेली तालुक्‍यातील ग्रामपंचायत हद्दीत 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून दहा दिवसांकरिता लॉकडाऊन लागू केला होता.

पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील लॉकडाऊन गुरुवारी (दि.23) मध्यरात्री संपत आहे. दोन्ही शहरातील व्यवहार शुक्रवारी सकाळपासून पूर्ववत सुरू राहणार आहेत. या हद्दीतील किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, मटण-चिकन विक्री, दूध विक्री आदी अत्यावश्‍यक सेवा दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान सुरू राहणार आहेत. उर्वरित सर्व प्रकारचे व्यवहार बंदच राहणार आहेत.