Pune Prahar : वडील रागावल्याने गळफास घेऊन आत्महत्या

139

पिंपरी : बहिणीसोबत किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावरून वडील रागावल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपीनगर येथे रविवारी (दि. १९) रात्री ही धक्कादायक घटना घडली. 

प्रणय किशोर भोई (वय २०, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.

लॉकडाऊनमुळे काही दिवसांपासून तो घरीच होता. दरम्यान, रविवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास प्रणय याची बहीण आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी प्रणय याच्या वडिलांनी त्याला रागावून त्याच्या खोलीत जाण्यास सांगितले.

प्रणय रागात खोलीत गेला. रात्री तो जेवण करण्यासाठी आला नाही म्हणून वडील त्याच्या खोलीत पाहण्यासाठी गेले. आवाज देऊनही त्याने दरवाजा उघडला नाही. यामुळे दरवाजा तोडला असता प्रणय याने साडीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.

जवळच्या खासगी रुग्णालयात त्याला त्वरित दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.