पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह अकरा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

172

पुणे : जमीन व्यवहाराद्वारे नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस शैलेश जगताप व परवेझ जमादार तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह अकरा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

जगताप, जमादार, बऱ्हाटे, जैन यांच्यासह जयेश जगताप, प्रकाश फाले, सविता फाले, यश फाले, ऍड. विजय काळे, विनय मुंदडा, मुकेश पौडवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला नावे आहेत. या आरोपींविरुद्ध यापूर्वी कोथरूड, समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून, त्यानंतर हा तिसरा गुन्हा आहे. तर शैलेश जगतापवर हा चौथा गुन्हा आहे. या प्रकरणी कैलास शिवाजी शिरसाट (वय 30, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश फाले याने कोथरूड व औंध येथील जमिनीचे व्यवहार करत असल्याचे सांगून या व्यवहारात रक्कम गुंतविल्यास दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखविले. फिर्यादीकडून 10 लाख, तर त्यांचे मेव्हणे विलास नेवगे यांच्याकडून 20 लाख रुपये असे एकूण 30 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. फिर्यादींनी पैसे परत मागितल्यानंतर फाले कुटुंबाने त्यांना शिवीगाळ केली. तर शैलेश जगतापने फिर्यादीला पिस्तूल दाखवून, तर जयेश व परवेझने शिवीगाळ, दमदाटी करीत पैशांची मागणी केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. काळे याने खोटे बोलून दिशाभूल केली.

जगतापविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा 

दरम्यान, सत्यभामा पोपट चांदगुडे (रा. वय 40, रा. घरकुल, चिखली) यांनी खडक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शैलेश जगतापसह प्रकाश फाले व मीना कंजानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंड्री येथील जागा विकायची असल्याचे सांगून जगताप, फाले, कंनी यांनी चांदगुडे यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले. व्यवहार झाल्यानंतर चांदगुडे यांना जमीन मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी जगतापकडे पैसे मागितले. तेव्हा त्यांना पैसे मागितले तर गुन्ह्यात अडकविण्याची धमकी जगतापने दिली. दरम्यान, दोन पोलिस ठाण्यांत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी पुढे आल्या.