Pune Prahar : सासूकडून सतत टोमणे, कंटाळलेल्या सूनेकडून बॅटने हत्या

180

मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका सूनेने सासूची बॅट मारुन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी टिळकनगरमध्ये राहणाऱ्या सूनेला अटक करण्यात आली आहे.

टिळक नगर परिसरातील पेस्टम सागर कॉलनीत एस.आर ए इमारतीमध्ये सज्जा पाटील (70) नावाची महिला राहत होती. ती आपल्या दत्तक मुलगा दिनेश पाटील आणि सून अंजना हिच्यासोबत राहत होती. सज्जाबाई घाटकोपर येथील एका मंदिराबाहेर बसून भीक मागायच्या. तर दिनेश हा दैनंदिन रोजगारावर काम करत होता. त्यामुळे त्यांचे घर हे सज्जाबाई यांच्या मिळकतीतून चालत असे.

सज्जा बाई या नेहमी आपल्या सूनेला हिणवत असे. त्यामुळे सून अंजना हिचा राग अनावर झाला. त्याच रागातून सूनेने घरातील बॅटने सज्जा बाईची हत्या केली. यानंतरही आपली सासू बाथरुममध्ये घसरुन पडली असा बनाव केला.

या घटनेनंतर टिळकनगर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेला. त्यावेळी डॉक्टरांनी तिची हत्या झाल्याचे सांगितले.

यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी आधी मुलाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मग सूनेला ताब्यात घेतलं आणि तिला पोलिसी हिसका दाखवला. त्यानंतर तिने सासूला बॅटने मारल्याची कबूली दिली.