Pune Prahar : कुख्यात गुंड निलेश वाडकरच्या साथीदाराला अटक

299

पुणे : विविध प्रकारचे गुन्हे नावावर असणाऱ्या आणि एका टोळीचा सदस्य असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडुन देशी बनावटीचे दोन पिस्तुल व आठ जीवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला.

आदिनाथ उर्फ आदित्य सोपान साठे (वय 25, रा. पर्वती) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे हा जनता वसाहतीमधील कुख्यात गुंड निलेश वाडकर व कुणाल कानडे यांचा साथीदार आहे.

दरम्यान, साठे हा दोन पिस्तुल घेऊन सिंहगड रस्ता येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ठिकाणी येणार असल्याची खबर पोलिस कर्मचारी रमेश राठोड यांना मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवले, पोलिस कर्मचारी राठोड, सुनील पवार, शीतल शिंदे यांच्या पथकाने साठे यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडुन देशी बनावटीचे दोन पिस्तुल व आठ जीवंत काडतुसे असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला.