Pune Prahar : पिंपरी चिंचवडमध्ये 56 ठिकाणी नाकाबंदी

166

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज (13 जून) मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, या लॉकडाऊनसाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस सज्ज झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पुढचे दहा दिवस 56 ठिकाणी नाकाबंदी तर 13 ठिकाणी चेकनाके असणार आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये 1 पोलीस आयुक्त, 1 अप्पर पोलीस आयुक्त, 3 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्याक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 2000 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरातील विविध भागात तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आज शहरातील विविध भागात फिरुन नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. कोरोनाला हरवायचं असेल तर पुढचे काही दिवस घरातच थांबावं लागेल, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, जो नागरिक घराबाहेर पडून नियमांचं उल्लंघन करेल त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारादेखील पोलिसांकडून देण्यात आला आहे.

पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. दरम्यान, 13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय दहा दिवस हॉटेल्स आणि लाँजदेखील बंद राहणार आहेत. पेट्रोल पंप आणि गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.
दरम्यान, सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत.

14 ते 18 जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील. तर 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहतील.

मटन, चिकन, अंडी यांची विक्री 14 ते 18 जुलै या पाच दिवसात पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर पुढचे पाच दिवस सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मटन, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहील.