Pune Prahar : रूग्णांसाठी सात हॉस्पिटलमध्ये ३०४ बेडची सुविधा

458

लोणी काळभोर (प्रतिनिधी) : हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेता हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी हवेली तालुक्यातील बारा खाजगी रुग्णालयातील सतराशे बेड अधिग्रहीत करण्याचे आदेश बुधवारी (ता. ८) रात्री उशिरा काढले होते. त्याप्रमाणे विविध ठिकाणची पाहणी करून पुर्व हवेलीतील आज ३०४ बेडची ताबडतोब व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती हवेली तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन खरात यांनी दिली. दोन ते तीन दिवसात बेडची व्यवस्था केली जाणार आहे. तालुक्यातील रुग्णांना घराजवळच उपचार मिळावेत या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील आठवड्यात पुर्व हवेलीतील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. रुग्णांची बेडसाठी अक्षरशः ससेहोलपट झाली होती. त्यामुळे सर्वांना उपचार मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे खरात यांनी सांगितले.

त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात कोरोना रुग्णांची थोड्याफार प्रमाणात धावपळ थांबणार आहे. मांजरी बुद्रुक येथे दोन दिवसात कोव्हिड सेंटर चालू होणार असल्याचे डॉ. खरात यांनी सांगितले. हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता ही संख्या खुपच अपुरी असून बेडची संख्या हळूहळू वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अधिग्रहीत केलेले हॉस्पिटल व बेडची संख्या : विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर (१५०) टप्प्या टप्प्यातने ५०-५० ने वाढ, प्रयागधाम हॉस्पिटल कोरेगाव मुळ (४० ), शिवम हॉस्पिटल (२४), लाईफ लाईन हॉस्पिटल वाघोली (२०), केअर हॉस्पिटल वाघोली (२०), महेश स्मृती मांजरी (२०), चिंतामणी हॉस्पिटल (३०) याप्रमाणे अधिग्रहित करण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील कोरोना रुग्णांची काही प्रमाणात योग्य अशी सोय होणार आहे.