Pune Prahar : बळजबरीचा लॉकडाउन कोणासाठी?

146

तब्बल ९० दिवसांचा लॉकडाउन पुणेकरांनी यापूर्वी अनुभवला आहे. हा ‘लॉकडाउन’ भाज्या आणण्यात, किराणा साठविण्यात गेला खरा, पण त्याकाळातही कोरोनाची साखळी तोडण्यात आपल्याला यश आले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सोमवारी रात्रीपासून लागू केल्या जाणाऱ्या ‘कडक’ वगैरे लॉकडाउनचा किती फायदा होईल, याबाबत साशंकता आहे.

पुण्यात गेली आठवडाभर दररोज एक हजाराच्या आसपास नवे रुग्ण आढळून येत आहेत. दररोज सरासरी १५ ते २० जणांना जीव गमवावा लागत आहे. रूग्णवाढीचा हा गुणाकार भविष्यात हाताळण्याच्या बाहेर जाईल, अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळेच ‘लॉकडाउन’चा मार्ग पुन्हा एकदा निवडला आहे. अर्थात ‘लॉकडाउन’ केल्यानंतर रुग्णांची संख्या अटोक्‍यात येईल, याला कोणताही शास्त्रीय आधार, डेटा प्रशासनाकडे नाही. कारण एप्रिल, मे मधील लॉकडाउनच्या काळात रूग्णवाढीचे आकडे, आताचे तपासणीचे आकडे आणि रुग्णांचे आकडे काढले तर त्यात सरासरी फारसा फरक दिसत नाही. सध्या चाचण्यांचे प्रमाण दररोज ४ हजार ३०० च्या आसपास आहे. त्यापैकी एक हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. रूग्णसंख्या चिंताजनक वाढते आहे, याबाबत कोणाचेच दुमत नाही. पण ही संख्या रोखण्याचा लॉकडाउन हा एकमेव उपाय निश्‍चितच नाही.

प्रशासनाचा भर रुग्णांसाठी उपचार कसे उपलब्ध होतील यावर राहिला. ते आवश्‍यकही होते. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालये, म्हाळुंगे-बालेवाडी येथील कोविड सेंटरची निर्मिती या उपाययोजना होऊन १८ हजार खाटांची सुविधा निर्माण झाली. पण, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यात आपण कमी पडलो.

चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यासही उशीर लागला. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांचे ट्रेसिंग योग्य पद्धतीने झाले नाही. नागरिकांमध्ये जागृती करण्यासही आपण कमी पडलो. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत गेली. पण, लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे जिणे मुश्‍कील झाले, बेकारी वाढली, हजारोंच्या संख्येने नोकऱ्या गेल्या. हे परिणाम कोरोनापेक्षाही भयंकर आहेत. अनलॉकमध्ये आता कुठे परिस्थिती सुधारतेय असे वाटत असताना सहाव्यांदा ‘लॉकडाउन’ची घोषणा करून मोठा दणका दिला आहे. लॉकडाउनमध्ये हजारो उद्योग बंद पडले. त्यासाठी सरकारने काय केले? किती नवे उद्योग-व्यवसाय उभे करण्यास मदत केली, असे एक ना अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. बळजबरीच्या लॉकडाउनपूर्वी त्याची उत्तरे मिळायला हवीत.