Pune Prahar : सासवडच्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता नाही : संजय जगताप

117

सासवड : पुरंदर तालुक्यात काल तब्बल 18 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निष्पन्न झाले. तर, आज 7 रुग्णांसह तालुका 192 वर पोचला. तालुक्यातील कोरोनाबाधीत गावे 30 वर पोचून धाकधूक वाढली आहे. सासवडमध्ये चारने रुग्ण वाढून एकूण रुग्ण 116 झाले. त्यामुळे सासवड शहरातील लॉकडाउन शिथिल न होता; मंगळवारपर्यंत  (ता. 14) सुरु राहिल; असे आमदार संजय जगताप व मुख्याधिकारी विनोद जळक यांनी जाहीर केले.

आज सासवडसह सोनोरी व परिंचे गावात रुग्ण वाढले. त्यातून तालुक्यात पंचवीसवरून चाळीसपर्यंत कंटेन्मेंट झोन झाले आहेत. रुग्ण वाढताहेत तरी अनेक कंटेन्मेंट झोनमधील लोक नियम पाळत नाहीत. कित्येक लोक बाहेर जा ये करताना दिसतात, अशी परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. या प्रशासनाकडून लक्ष देण्याची मागणी विविध गावातून होत आहे. उद्या शहरातील कन्टेन्मेंट झोनमधील लांडगे गल्लीत प्रत्येकाची कोरोना पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी सुरू होईल, असेही आमदार जगताप यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यात रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कन्टेन्मेंट झोन केले जातात. पण, आवश्यक ती काळजी घेऊन नियम लोकांकडून पाळले जात नाहीत. प्रशासनामार्फत त्यावर अपेक्षित लक्ष नसल्याने तिथेच वारंवार रुग्ण आढळून येत आहेत. यावर लक्ष दिले तरच आणि पुणे कनेक्शनधून होणारा संसर्ग रोखला तरच परिस्थितीवर नियंत्रण येईल, हे स्पष्ट आहे.