Pune Prahar : राज्यातील हॉटेल्स, लॉज 8 जुलैपासून खुले होणार

145

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरसारख्या शहरांसाठी तसेच महापालिका असलेल्या शहरांसाठी वेगळी अट घालण्यात आली आहे. याठिकाणच्या कन्टेन्मेंट झोनपासून बाहेर असलेल्या हॉटेलना ही परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज हे त्यांच्या क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना राहण्याची परवानगी देऊ शकणार आहेत. 

तसेच उर्वरित राज्यासाठीदेखील 33 टक्के क्षमतेची अट घालण्यात आली आहे. हे हॉटेल्स किंवा गेस्ट हाऊस क्वारंटाईन सेंटर केली गेली असतील तर ती पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकणार आहे. तसेच 33 टक्के क्षमता ग्राहकांसाठी वापरल्यानंतर उरलेली 67 टक्के क्षमता ही क्वारंटाईनसाठी वापरण्याचे अधिकार हे सर्वस्वी स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. यावेळी ठाकरे यांनी हॉटेल मालकांना कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करू नका असे आवाहन केले आहे. हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात येऊ शकतात. राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.