Pune Prahar : पुण्यातील ‘हा’ भाग ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

380

घोरपडी : बी. टी. कवडे रस्ता आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.   परिसरातील भीमनगर या वस्तीमध्ये 15 दिवसात जवळपास तीनशे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भीमनगर कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट झाला आहे. परिसरात रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी परिसरातील सर्वात मोठी झोपडपट्टी भीमनगर येथे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वस्तीत रुग्ण संख्या हळूहळू वाढत गेली. सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात २९५ रुग्ण आहेत. त्यातील १३ रुग्ण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले असून घरी आले आहेत. आणखी शंभर नागरिकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे बाकी आहे.

मनगरमध्ये पहिला रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. स्वच्छता आणि औषध फवारणी यावर भर दिला आहे. तसेच परिसरातील रोज शंभर ते दीडशे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे आहे. त्यामध्ये ३० ते ४० रुग्ण सापडत असून भविष्यात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या या वस्तीत कष्टकरी, रोजंदारीवर काम करणारे कामगार, घरगुती काम करणाऱ्या महिला, परिसरातील शिर्के कंपनी, भारत फोर्स, कल्याणी स्टील कंपनीत काम करणारे लोक राहतात. तसेच रिक्षा चालक, स्कूलबस चालक, पेंटिंग व गवंडी कामगार यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. आधीच लॉकडाऊन आणि आता कोरोनाचा कहर यामुळे या परिसरातील नागरिकांचे आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. अनलॉकमुळे काम सुरू झाले, परंतु वस्तीत रुग्ण वाढत असल्यामुळे संपूर्ण वस्ती सील केली आहे. त्यामुळे अनेकजण घरातच अडकून पडले आहेत.

रुग्ण वाढत असल्यामुळे भीमनगर मधील निम्मे लोक क्वारंटाइन झाले असून जवळपास ३०० नागरिक विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मागील आठवड्यातपासून वस्तीत तपासणीवर भर दिला जात असून रोज १०० ते १५० नागरिक क्वारंटाइन केले जात आहेत. वेगवेगळ्या दिवशी तपासणी केल्यामुळे त्यानुसार अहवाल आल्यावर एकाच घरातील व्यक्ती विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यामुळे मोबाईलद्वारे संपर्का साधून एकमेकांची विचारपूस करत आहेत. नेहमी लोकांनी गजबजलेले भीमनगर सध्या कोरोना मुळे रस्त्यावर कोणी फिरकत नसल्याने शांत झाले आहे.

पोटापाण्यासाठी रोज कामावर बाहेर जाणारे नागरिक आता कोरोनामुळे वस्तीत अडकून पडले आहेत. लहान घरे, अरुंद गल्ली, स्वतंत्र शौचालयाचा अभाव आणि सार्वजनिक शौचालय यामुळे संसर्ग वाढत आहे. तसेच वस्ती पातळीवर स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण असते. यामुळे भीमनगर मध्ये रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच भीमनगर मधील १३ नागरिक कोरोना मुक्त झाले आहेत. ९० टक्के रुग्णांना कोरोनाचे लक्षण नाही आणि बरे होणाऱ्या नागरिकांची  संख्या ही मोठी असल्याने भीमनगरवासियांना यामुळे दिलासा मिळाला आहे.