Pune Prahar : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर राज ठाकरे म्हणाले…

229

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूडमध्ये वाद उसळला आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच ट्विटरद्वारे आपली भूमिका मांडत खुलासा केला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला गेला. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा, अशा आशयाच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी हे इथे स्पष्ट करू इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, धन्यवाद.”

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर वाद उसळला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करत असून त्यांनी अनेकांना तपासासाठी बोलाविले आहे. हा तपास सुरू असतानाच महाराष्ट्र नव निर्माण सेनेची भूमिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे बॉलिवूडमध्ये वेगळी चर्चाही सुरू झाली होती. त्या वादावर आता खुद्द राज ठाकरे यांनीच आपली भूमिका मांडत खुलासा केला आहे.

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गेल्या रविवारी (14 जून) आपले जीवन संपवले. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. मात्र, यावर अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, सुशांत सिंह राजपूत हा बराच काळ मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे सुशांत सिंग राजपूतच्या मानसिक तणावाचे कारण काय होते, ज्यामुळे त्याला आत्महत्या करायला भाग पाडले, अशी चर्चा आता बॉलिवूडमध्ये रंगली आहे.