Pune Prahar : अखिल भारतीय सांस्कृतिक संघाला ‘आयएसओ’ मानांकन

10

पुणे : सांस्कृतिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून कार्य करणाऱ्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ या संस्थेला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक क्षेत्रात हे मानांकन प्राप्त करणारी ही देशातील एकमेव संस्था असल्याचा दावा आयएसओ, बीएमजीचे प्रतिनिधी आणि विख्यात सनदी लेखापाल कौस्तुभ शहा यांनी केला.

संस्थेच्या अध्यक्ष रत्ना वाघ यांनी शहा यांच्या हस्ते हे मानांकन स्वीकारले. या वेळी सचिव हेमंत वाघ व संचालक मुकुंद नगरकर, नृत्यगुरु राजसी वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक बंध बळकट करून विविध देश आणि संस्कृतींमध्ये एकत्वाची आणि सौहार्दपूर्ण नात्याची वीण बांधण्याचे काम सांस्कृतिक संघ अनेक वर्ष करीत आहे. त्यासाठी युनेस्कोने त्यांची प्रतिनिधी म्हणून निवड करून या कामाची पावती दिली आहे, असेही शहा यांनी सांगितले.

भारतीय बहुभाषिक नृत्य, नाट्य, गायन, वादन सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाच्या माध्यमातून देशांतर्गत कला, संस्कृती देवाणघेवाण करण्यास सांस्कृतिक संघाने प्रोत्साहन दिले आहे

युनेस्कोच्या पाठिंब्याने देशोदेशीच्या कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करीत आहे, अशी माहिती रत्ना वाघ यांनी दिली.

‘कल्चरल ऑलिंपियाड’च्या माध्यमातून जगभरातील कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करीत आहे, अशी माहिती हेमंत वाघ यांनी दिली.