Pune Prahar : Google Pay वापरता? बातमी वाचली पाहिजे!

35

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले आहेत. देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात देशात ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात गुगल पे हे अ‍ॅप वापरले जाते. पण सोशल मीडियावर गुगल पे वापरु नका ते धोक्याचे असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. आता गुगल पे नेच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. गुगल पे ने एक निवेदन जाहीर केले आहे. Google pay भारतात अधिकृत आहे आणि देशातील अन्य मान्यताप्राप्त UPI अ‍ॅप प्रमाणेच कायदेशीर असल्याचे गुगल पेने स्पष्ट केले आहे.

मागील काही दिवसांपासून गुगल पे वरील अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. गुगल पे वरुन ऑनलाईन व्यवहार करणे, तसेच पैसे ट्रान्सफर करणे सुरक्षित नाही. आरबीआयने गुगल पे या पेमेंट अ‍ॅपवर बंदी घातली आहे असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सोशल मीडियावर व्हायरल झालेला गुगल पे बाबतचा दावा फेटाळून लावला आहे. लॉकडाऊन काळात गुगल पेमेंटचा वापर जास्त प्रमाणात सुरु होता. त्यामुळे या मेसेजची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

गुगल पे ने याबाबत निवेदन जाहीर केले आहे. आम्ही सोशल मीडियावर शेअर झालेल्या काही गोष्टी पाहिल्या. ज्यामध्ये गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर करणे हे कायद्याने सुरक्षित नाही असे म्हटले आहे. तसेच हे अ‍ॅप अनअधिकृत असल्याचेही म्हटले आहे. मात्र हे खरे नाही. गुगल पे हे थर्ड पार्टी अ‍ॅप आहे. पण पेमेंट्स पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित केले जातात. NPCI च्या वेबसाईटवर हे तुम्ही व्हेरिफाय करू शकता” अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. सोशल मीडियावरुन फिरणारा मेसेज अफवा असल्याची माहिती गुगल पे ने दिली आहे.