Pune Prahar : डायल १०८ सेवेतील कोरोनायोद्ध्यांच्या कामातून मानवतेचं दर्शन – टोपे

95

पुणे : महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा (डायल १०८) ही मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या सेवेतील कर्मचारी कोरोनायोद्धे आहेत. त्यापैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, कोरोनामुक्त होऊन त्यांनी पुन्हा सेवा सुरु केलेली आहे. त्यांच्या या उदंड उत्साहातून मानवतेचं दर्शन घडतं, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डायल १०८ सेवेबद्दल कौतुकोद्गार काढले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा राबविली जाते. ही सेवा भारत विकास समूहाद्वारे संचलित केली जाते. या सेवेच्या नियंत्रण कक्षाला नुकतीच टोपे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींवर आधारलेली महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय मदत सेवा महाराष्ट्रात मोलाचे कार्य करत आहे. आतापर्यंत ४९ लाख २२ हजार ९३६ रुग्णांना उपचार करण्याचे आणि व्यवस्थितपणे रुग्णालयात पोहोचविण्याचे काम या सेवेच्या माध्यमातून झालेले आहे. जवळपास ३५,२६१ बाळांचा जन्म या सेवेच्या रुग्णवाहिकेत झालेला आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत जवळपास एक कोटीहून अधिक फोन कॉल्स प्राप्त झालेले आहेत. चांगली आरोग्य सेवा देणे ही आजच्या काळाची गरज आहे.”

टोपे पुढे म्हणाले, “या सेवेच्या माध्यमातून जवळपास ५००० जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्यातून तरुणांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिथं लोक भयभीत होऊन घरात बसलेले आहेत, तिथं या सेवेतील बहादूर कोरोनायोद्ध्यांनी अतिशय चांगली सेवा देण्याचं काम केलेलं आहे. यापैकी अनेक कोरोनायोद्धे कोरोनाने बाधित झाले आहेत. पुन्हा उपचार घेऊन बरे होऊन कामाला लागले आहेत. हा उत्साह प्रचंड मोठा आहे आणि यातून मानवतेचं दर्शन होतं. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा.”

कशी वापरायची १०८ सेवा?
अपघात, पडझड, हल्ला, हृदयविकाराचा झटका किंवा अन्य प्रकारच्या वैद्यकीय मदतीसाठी लँडलाईन किंवा मोबाईलवरून फक्त १०८ हा क्रमांक डायल करायचा. अवघ्या दोन रिंग नंतर तुमचा फोन या स्वीकारला जाईल. त्यानंतर अगदी थोडक्यात घटना स्थान वगैरे विचारलेली आवश्यक माहिती द्यावी. त्यानंतर अगदी काही मिनिटात तुम्ही सांगितलेल्या आपत्कालिन ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचेल. ही सेवा तुम्ही स्वतःसाठी किंवा वैद्यकीय मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींसाठी वापरू शकता.