Pune Prahar : तरुणावर वार करणारे फरार आरोपी अटकेत

184

किरकटवाडी : सिंहगड रोड परिसरातील नांदेड फाटा ता. हवेली येथील सुरज रमेश देडगे (वय 25) या तरुणावर रविवारी (दि.21) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तलवार, कोयता अशा धारदार शस्त्रांनी तब्बल अकरा वार करत जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर फरार झालेल्या सर्व आरोपींना पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हवेली पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सापळा रचून अटक केली असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे.

प्रतीक नितीन कंक (वय 20), मारुती लक्ष्मण ढेबे (वय 19), तेजस रमेश मारणे (वय22), अजय व्यंकटेश उकरडे (वय 21), ऋतिक प्रताप गायकवाड (वय 20) व एक अल्पवयीन सर्व राहणार नांदेड फाटा तालुका हवेली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अगोदर झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

या गुन्ह्यातील दोन आरोपी प्रतीक अंक व मारुती ढेबे यांना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार मुकुंद अयाचित, सुनिल जावळे,प्रमोद नवले, पोलीस नाईक विजय कांचन, गुरु जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत,धीरज जाधव या गुन्हे शाखेच्या पथकाने खारवडे ता. मुळशी येथून अटक केली.

तर तेजस मारणे, अजय उकरडे, ऋतिक गायकवाड व एक अल्पवयीन यांना हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार संजय शेंडगे, पोलीस नाईक रामदास बाबर, रवींद्र नागटीळक,पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत सोनवणे, संतोष भापकर, गणेश धनवे,राजेंद्र मुंढे अभिमन्यू धुमाळ व होमगार्ड सत्यम काळे,प्रविण घुले यांच्या पथकाने नांदेड फाटा येथील एम‌.आय.डी.सी. मैदानावरून गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम हे करत आहेत.

पूर्ववैमनस्यातून व वर्चस्ववादातून नांदेड, किरकटवाडी, खडकवासला या भागांमध्ये गुन्हेगारी तोंड वर काढताना दिसत आहे. दहशत माजविण्यासाठी गोळीबारासारख्या गंभीर घटनाही मागील काही काळामध्ये या भागांमध्ये घडल्या आहेत.वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनाने अशाप्रकारची संघटित गुन्हेगारी कायमची मोडून काढण्यासाठी अत्यंत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

आरोपी ‘अटक’ की ‘हजर’?

एखादा गंभीर गुन्हा घडला की स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस स्टेशन यांच्याकडून गुन्ह्यातील आरोपी पकडण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जाते. आरोपींना पकडून देण्यासाठी किंवा हजर करण्यासाठी काही ‘मांडवली किंग’ मध्यस्थी करत असतात. आरोपी ‘हजर’ करताना मोठी ‘देवाण-घेवाण’ होत असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळतात.

गुन्हेगाराला जिकडे सोयीस्कर वाटेल तिकडे ‘गुन्हे शाखा’ किंवा ‘पोलिस स्टेशन’ मध्ये हजर होण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असतो. मात्र आरोपी हजर होऊ किंवा अटक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिस प्रशासनाचा वचक निर्माण करण्यासाठी पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते.