Pune Prahar : पुन्हा राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनाची थाप

147

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजवला आहे. सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाची लागण झाली आहे. अशातच आज पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनानं शिरकाव केला आहे. राज ठाकरे यांच्या दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही वाहन चालकांवर सध्या मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाला होता. कारण राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले. त्यानंतर आता दोन वाहन चालकांना कोरोनाची लागण झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिन्ही पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. हे तीन पोलिस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन आता कोरोनामुक्त झालेत.

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात 

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. दहा दिवसांपूर्वी मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे ठणठणीत असल्याने त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांना पुढील 14 दिवस घरातच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते लगेचच कामात रुजू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

धनंजय मुंडे यांच्यासह 5 जणांना कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे दोन स्वीयसहायक, मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक अशा पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. विशेष म्हणजे यापैकी कुणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसून आली नव्हती. दिलासादायक म्हणजे धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

दरम्यान, या आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली.