Pune Prahar : सासवडमध्ये रंगला सोपानदेवांच्या पादुकांचा सोहळा

104

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड येथे गुरुवारी ज्येष्ठ वद्य द्वादशीनिमित्त पारंपरिक पद्धतीने संत सोपानदेवांच्या चांदीच्या पादुकांचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. 

या निमित्ताने श्री संत सोपान महाराजांचे मंदीर अनेक दिवसांनी पंढरीच्या प्रस्थानासाठी थोडे खुले झाले. मात्र, फिजीकल डिस्टंन्सिंग ठेवूनच दर्शन होत आहे. या उत्सवी वातावरणात; पण पारंपरिक पद्धतीत कमी गर्दीत आज सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सायंकाळी झाला. या वेळी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, देवस्थानचे अध्यक्ष व मुख्य विश्वस्त गोपाळ महाराज गोसावी, श्रीकांत गोसावी, माउलींच्या पालखीचे चोपदार राजाभाऊ व रामभाऊ चोपदार, काही दिंडी प्रमुख व निवडक वारकरी तपासणी करुनच सोहळ्यात सामिल केले होते. पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, राहुल घुगे व सहकाऱ्यांचा बंदोबस्त चोख होता.

संत सोपान महाराजांच्या चांदीच्या पादुकांचे प्रस्थानासाठी पादुका पालखीत ठेवून मंदिराबाहेर नेल्या नाहीत. त्यामुळे नागरिक व भाविकांना पादुकांचे स्पर्श दर्शन यंदा झाले नाही. प्रस्थानानिमित्त आज पहाटे चार वाजता समाधीवर पवमान अभिषेक व आरती झाली. सकाळी दहाला संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वर्णनाचे कीर्तन, नैवेद्य व प्रसाद वाटप झाले. सायंकाळी प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात होत परंपरेनुसार देवाच्या पादुका मानकरी अण्णामहाराज केंजळे यांनी पालखीत ठेवल्या. त्यानंतर वीणा मंडपातून पालखी बाहेर आणून मंदिर प्रदक्षिणा झाली. देऊळवाड्यात पूर्वेकडील दिवाणखान्यात पादुका विराजमान झाल्या. दरम्यान दोन अभंग व समाजआरती झाली.

श्रींच्या पादुका बारा दिवस येथेच रहातील. ठरल्याप्रमाणे किमान वारक-यांच्या उपस्थितीत पुढील बारा दिवस भजन- कीर्तनाचा नैमित्तीक कार्यक्रम संपन्न होत राहील. त्यानंतर 30 जूनला (आषाढ शुद्ध दशमी) सकाळी दहा वाजता पादुका खासगी गाडीने वारीसाठी मंदिरातून निघतील. पुढील कार्यवाही शासन परवानगीनुसार होईल. तोपर्यंत मंदिर बंदच रहाणार आहे.