Pune Prahar : देशातील ‘ही’ राज्य लॉकडाउन लागू करण्याच्या विचारात

166

देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे काही राज्यांनी पुन्हा निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक 1.0 अंतर्गत काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. आता काही प्रमाणात पुन्हा निर्बंध लागू होणार आहेत. काही राज्य पूर्णपणे लॉकडाउन करण्याच्या विचारामध्ये आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आठडयाच्या अखेरीस आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी निर्बंध अधिक कठोर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ईपास धारकांनाच प्रवासाची परवानगी दिली आहे. वैद्यक क्षेत्र आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वांना ईपास डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्लीहून पंजाबमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी बंधनकारक करण्याचा पंजाब सरकारचा विचार आहे. दिल्लीहून पंजाबमध्ये दररोज ७०० ते ८०० गाडया येतात. चेन्नईमधील वाढत्या रुग्ण संख्येवर मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. एकटया चेन्नई शहरामध्ये का लॉकडाउन केले जाऊ शकत नाही? असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडू सरकारला विचारला.

तामिळनाडूतील एकूण करोना रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण एकटया चेन्नईमध्ये आहेत. चेन्नईत आतापर्यंत २५ हजार नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. झाऱखंडमध्ये सत्तेमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे पूर्णपणे लॉकडाउन लागू करण्याची मागणी केली आहे. केरळ कंटेन्मेंट झोन ठरवण्याच्या पद्धतीत काही बदल करुन अजून कठोर निर्बंध लागू करु शकतो.