Pune Prahar : संसद अधिवेशनाला खासदार रोटेशनने

60

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला खासदार येतील ते आवर्तन (रोटेशन) पद्धतीने. कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर सामाजिक अंतर राखण्यासाठी या पद्धतीने अधिवेशन घेतले जाऊन सदस्यांना आवर्तनाने हजर राहण्यास सांगितले जाईल.

समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू हे वेगवेगळ््या राजकीय पक्षांशी त्यांचे खासदार आळीपाळीने हजर राहावेत म्हणून संपर्क साधत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सांगितले की, ‘‘अध्यक्ष तीन दिवसांपूर्वी याबाबत माझ्याशी बोलले. खासदारांनी आवर्तन पद्धतीने हजर राहण्यास आमचा काही आक्षेप नाही.’’ लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही याबाबत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे.

लोकसभेत काँग्रेसच्या ५४ खासदारांचे नेते अधिर रंजन चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘‘सन्माननीय, सभापतींशी या सूचनेवर चर्चा झाली असून आम्हाला कोणताही आक्षेप नाही.

खासदारांची आळीपाळीने उपस्थिती ही एक दिवसआड किंवा तीन दिवसांतून एकदा असू शकेल. याचा अर्थ प्रत्येक पक्षाचे एक तृतीयांश खासदार विशिष्ट दिवस येतील आणि राहिलेले खासदार नंतरच्या दोन दिवसांत. ही काही आदर्श परिस्थिती नाही आणि आम्हाला ती आवडलेली नाही. परंतु, परिस्थितीमुळे सध्या पर्याय नाही.’’

दोन अधिवेशनांत सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये या घटनेतील अटीचेपालन करण्यासाठी हे छोटेसे अधिवेशन घेतले जात आहे. शेवटचे अधिवेशन २३ मार्च रोजी घेतले गेले होते व पुढील अधिवेशन २३ सप्टेंबरपूर्वी घेतले जायला हवे.