Pune Prahar : बायको असावी तर अशी… पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, पण…

259

नवी दिल्ली : सध्या पती-पत्नी यांच्यात होणारी भांडणं ही फार किरकोळ बाब समजली जातात. कारण, प्रत्येक घरातील कहाणी असल्याचे म्हटले जाते. अशा भांडणांमध्ये प्राणघातक हल्ला ते खून होण्याच्या घटनाही घटल्या आहेत. मात्र, दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे एक हैराण करणारी घटना घडली.

पतीने रागाच्या भरात पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा आणि नंतर स्वत: ला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पतीलाच त्याच्या पत्नीने संकटातून वाचविल्याचा प्रकार घडला. आगीमुळे पती जखमी झाला असून त्याला लालबहादूर शास्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी आरिफ मेरठला गेला. त्यानंतर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तो तिथेच अडकला. काही दिवसांनंतर लॉकडाउन उघडल्यानंतर आरिफ दिल्लीला परतला. आरिफ आणि त्याची पत्नी यांच्यात सतत वाद होत होते. मेरठहून परत आल्यानंतर 35 वर्षीय आरिफने हा वाद कायमचा संपविण्याची प्लॅन आखला. यासाठी त्याने पत्नीला आणि मग स्वत:ला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

पत्नीला जाळून मारण्यासाठी आरिफने पेट्रोल आणले. मंगळवारी त्याने पत्नीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने स्वत: वर पेट्रोल ओतून घेतले. पतीचे हे कृत्य पाहून पत्नीने आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, तेवढ्यात आरिफच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यानंतर लगेच पत्नीने आरिफच्या अंगावर ब्लॅकेट टाकून आग विझविली. दरम्यान, ही घटना त्रिलोकपुरीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या आरिफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.