Pune Prahar : प्रेमाचे पुरावे दाखवा अन् एकमेकांना भेटा…

249

कोपेनहेगन : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे प्रेमीयुगलांचे हाल होऊ लागले. पण, एका देशाने प्रेमीयुगलांना काही अटींवर भेटण्याची परवानगी दिली आहे.

प्रेमीयुगलांना लॉकडाऊनदरम्यान चॅटींग, व्हिडिओ कॉलिंग अथवा फोनवरूनच बोलता-पाहता येत होते. पण, प्रत्यक्षात भेट घेता येत नव्हती. यामुळे अनेकांची तळमळ सुरू होती. डेन्मार्कशेजारील देशातील लोकांना डेन्मार्कमधील आपल्या होणाऱ्या जोडीदाराला, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भेटता येणार आहे. मात्र, त्यांना आपल्या प्रेमाचे पुरावे दाखवावे लागणार आहेत. नियमानुसार डेन्मार्कमध्ये तुमचा जोडीदार, गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड राहत असेल आणि त्याला भेटायचे असेल तर तुम्ही भेटू शकता.

मात्र, त्यासाठी दोन अटी आहेत. एक म्हणजे त्यांच्या नात्याला 6 महिने पूर्ण झालेले असावे आणि दुसरे म्हणजे त्यांनी आपल्या प्रेमाचे पुरावे दाखवावेत. यामध्ये लव्ह लेटर, फोटो काहीही दाखवू शकता. पण, ऑनलाइन रिलेशनशिपसाठी डेन्मार्कच्या सीमा खुल्या केल्या जाणार नाही. ज्यांचे प्रेम फक्त फोन, इंटरनेट किंवा पत्राद्वारे जुळले आहे, त्यांना भेटता येणार नाही. असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

पोलिस अधिकारी एलेन डेगलर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले की, ‘एखाद्या व्यक्तीसह आपले नाते आहे, त्याचे पुरावे दाखवणे हे खूप खासगी आहे. पण, जोडीदाराला प्रवेश मिळणार की नाही हे पोलिस अधिकाऱ्यावर अवलंबून आहे.’