क्वारंटाइनमधून पळाला, घरी पोहोचला आणि…

146

छत्तीसगड | क्वारंटाइन सेंटरमधून पळालेल्या एका स्थलांतरित मजुराने घरी पोहोचल्यानंतर थेट पत्नीवर हल्ला केला. छत्तीसगडच्या जाशपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. दुसऱ्या राज्यातून आल्यामुळे या मजुराला क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वारंटाइन सेंटरमध्ये असताना, या मजुराला पत्नीचे परपुरुषासोबत प्रेमसंबंध सुरु आहेत या संशयाने पछाडले होते.

पत्नी आपली फसवणूक करत आहे. दुसऱ्या कोणाबरोबर तरी तिचे सूत जुळले आहे असा संशय त्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जखमी पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

क्वारंटाइन सेंटरमध्ये असताना हा मजूर पत्नीला फोन करायचा, तेव्हा सतत तिचा फोन बिझी असायचा. दुसऱ्या कोणाबरोबर तरी बोलणे सुरु असायचे. त्यामुळे त्याच्या मनात संशय बळावला असे पोलिसांनी सांगितले. बुधवारी रात्री त्याने पुन्हा फोन केला. त्यावेळी पत्नीचा फोन बिझी आला. त्यामुळे चिडलेल्या मजुराने गच्चीवरुन उडी मारुन क्वारंटाइन सेंटर बाहेर पळ काढला.

पत्नीचे काय सुरु आहे हे पाहण्यासाठी त्याने थेट घर गाठले. त्यावेळी मोबाइलवरुन पत्नीचे कोणाबरोबर तरी बोलणे सुरु असल्याचे त्याने पाहिले. चिडलेल्या मजुराने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली व पत्नीचा हातच कापून टाकला. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

पत्नी जमिनीवर विव्हळत पडलेली असताना तो मोठमोठया ओरडून तिच्यावर आरोप करत होता. पत्नीला त्याच अवस्थेत सोडून त्याने तिथून पळ काढला. जखमी महिलेला रुग्णालयात नेले पण तो पर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे डॉक्टरांना हात जोडण्याची शस्त्रक्रिया करता आली नाही.