मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे गाड्या उपलब्ध करा : काँग्रेस

71

पुणे : परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जास्तीत जास्त रेल्वे गाड्या उपलब्ध करून घ्या, अशी मागणी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, महासचिव संगिता तिवारी उपस्थित होते. आपापल्या मूळ गावी जाणाऱ्या सर्व मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र मोफत देण्याचे आदेश काढणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

आजपर्यंत जवळपास 45 हजार मजूर पुणे जिल्ह्यातून त्यांच्या गावी गेले आहेत. त्याचे चांगले नियोजन केले. कंटेन्मेंट झोनमध्येही प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. तर, रेल्वेमध्ये प्रवास करताना मजुरांना विक्रीसाठी पाणी ठेवावे, अशी मागणीही काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे आहे. त्यासाठी हे मजूर सध्या शहरातील विविध पोलीस स्टेशन बाहेर गर्दी करीत आहेत. पोलिसांनीही या मजुरांची नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओरीसा राज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मजूर वर्गात भितीचे वातावरण आहे.