मोदी सरकार लघुउद्योगांसाठी ही 6 महत्त्वाची पावले उचलणार

54

भारताच्या विकास आणि वृद्धीसाठी आवश्यक असणारं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच मोदींनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

लघुउद्योगाच्या दृष्टीने उचललेली 6 महत्त्वाची पाऊले –

1. मध्यम-सूक्ष्म आणि लघु, कुटीर आणि गृहउद्योगांना सध्या पैशांची कमतरता जाणवत असून या उद्योगाद्वारे देशातील 12 करोड लोकांना रोजगार मिळतो. या सर्व उद्योगांना 3 लाख कोटींचं विनातारणी कर्ज देण्याचं अर्थमंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं.

2. सरकारतर्फे 20 हजार करोड रुपयांची तरतूद आर्थिक तुटीत असलेल्या संस्थांना देण्यात येणार असून त्यांना चालना देण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. देशातील 45 लाख सूक्ष्म उद्योजकांना फायदा होण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजची मदत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं.

3. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना वाढीसाठी आवश्यक पैसे उपलब्ध होण्यासाठी 50 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यासाठी ‘फंडांचा फंड’ काढण्यात येईल असंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.

4. MSME(सूक्ष्म-मध्यम-मोठे उद्योगांची) व्याख्या बदलण्यात आली असून यातील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. लघुउद्योजकांसाठी 1 करोड रुपयांची गुंतवणूक आणि 5 करोड रुपयांची उलाढाल आतापासून ग्राह्य धरण्यात येणार आहे. उत्पादन आणि सेवा पुरवठा करणाऱ्यांसाठी ही मर्यादा सारखीच राहील असं सांगण्यात आलं आहे. मध्यम उद्योगांसाठी 10 करोड रुपयांची गुंतवणूक आणि 50 करोड रुपयांची उलाढाल तर मोठ्या उद्योगांसाठी 20 करोड रुपयांची गुंतवणूक आणि 100 करोड रुपयांची उलाढाल ही सुधारणा करण्यात आली.

5. 3 लाख करोड रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर यांच्या कामात आणि स्पर्धेत वाढ होईल हे लक्षात घेऊन 200 कोटींपेक्षा मोठी असलेली जागतिक कंत्राटे घेतली जातील आणि ती या उद्योगांना जोडली जातील, असं यावेळी सांगण्यात आलं.

6. 45 दिवसांच्या मुदतीमध्येच या कर्जाचं वाटप करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.