पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना, लॉकडाउनवर 2 तास चर्चा

450

कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची चौथ्यांदा चर्चा, शहांचीही उपस्थिती

नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन संपुष्टात येण्याच्या अवघ्या 6 दिवसांपूर्वी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये कोरोना व्हायरसची देशातील सद्यस्थिती आणि लॉकडाउनवर चर्चा करण्यात आली. चर्चेला पंतप्रधानांसमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित आहेत. कोरोना व्हायरसवर पीएम मोदींनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे. या चर्चेत केरळच्या मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. त्यांनी आपल्या जागी राज्याच्या सचिवांना पाठवले. तसेच वेळ कमी असल्याने 9 मुख्यमंत्र्यांशीच बोलता आले.

लॉकडाउनचा दुसरा भाग 3 मे रोजी संपणार आहे. तत्पूर्वी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 20 आणि 25 एप्रिल रोजी दोन वेळा लॉकडाउनमध्ये सूट दिली. यामध्ये काही अटी सुद्धा देण्यात आल्या असून त्या-त्या राज्यांवर याच्या अंमलबजावणी संदर्भातील निर्णय सोपविला.

यापूर्वी 20 मार्च, 11 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांशी बोलले मोदी

पीएम मोदींनी यापूर्वी कोरोनाग्रस्त वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर 20 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सामंजस्य, राज्यांमध्ये प्रशिक्षित स्टाफ वाढवणे, स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. 2 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा संवाद साधला. त्यानंतर पंतप्रधानांनी 11 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांसोबत तिसऱ्यांदा संवाद साधला. यामध्ये 14 एप्रिल रोजी देशातील पहिला लॉकडाउन संपणार की नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता. त्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांनी ‘जान है तो जहान है’ असे म्हणत लॉकडाउन वाढवण्याचा सल्ला दिला होता. तसेच केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आप-आपल्या राज्यात लॉकडाउन वाढवत असल्याचे जारी केले होते.