सनातन संस्थेचे कार्य अध्यात्मप्रसाराचे, हिंसाचाराचे नव्हे : सनातन संस्था

192
  • अटक केलेल्या हिंदुत्ववाद्यांना सनातनचे साधक असल्याचे घोषित करून सनातनवर बंदीचा हिंदूविरोधकांचा डाव !

मुंबई – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून मागील काही दिवसांमध्ये काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक झाली. हे सर्व जण सनातनचे साधक असल्याचा दुष्प्रचार काही पुरोगामी व्यक्ती, संघटना, तसेच काँग्रेसादी पक्षांचे राजकीय नेते जाणीवपूर्वक करत आहेत. या संदर्भात वेळोवेळी सनातन संस्थेने आपली भूमिका स्पष्ट केली होती, ती आजही स्पष्ट करू इच्छितो की, अटक झालेल्यांपैकी एकही जण सनातनचा साधक नाही. यातील कळसकर, अंदुरे, सुरळे बंधू आणि रेगे ही पाच नावे तर आम्ही प्रथमच ऐकली आहेत. त्यामुळे त्यांचा सनातनशी संबंध कोणीही जोडू नये. सनातन संस्था ही समाजात संविधानिक मार्गाने अध्यात्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था असून, सनातनची कोणतीही शिकवण हिंसाचाराच्या दिशेने नाही. अटक झालेल्यांपैकी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदुसंघटनाच्या विविध उपक्रमांमध्ये स्थानिक स्तरावर सहभागी होत असले तरी, त्यांचे स्वतःचे विविध संघटनांच्या माध्यमातून कार्य चालू होते. त्यामुळे त्यांना अटक केल्याने सनातनवर बंदी घाला वा सनातनच्या प्रमुखांना अटक करा असे म्हणणे, म्हणजे काँग्रेसचे समर्थन करणार्‍या पक्षाच्या नेत्याला अटक झाल्यावर काँग्रेसवर बंदी घाला वा राहुल गांधींना अटक करा, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे. यात अध्यात्मप्रसार करणार्‍या लहानशा सनातन संस्थेला सर्व पुरोगामी नेते लक्ष्य करत असले तरी, त्यांचा खरा उद्देश हा आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हिंदु आतंकवादाच्या नावे भाजप सरकारला बदनाम करण्याचा आहे.

सनातन संस्थेवर केले जाणारे सर्व आरोप हे एटीएस् आणि सीबीआय या तपाससंस्थांकडून अनधिकृतपणे मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हणजेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून केले जात आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते की, या प्रकरणी कुठल्याही विशिष्ट संघटनेचे नाव घेतलेले नाही. पोलीस तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. आम्हाला प्रश्‍न पडला आहे की, मग या सर्व बातम्यांच्या मागे असा कोणता सोर्स आहे ? यातील एकाही यंत्रणेने अधिकृतपणे सनातनचा संबंध असल्याचे सांगितलेले नसतांना सनातनची होत असलेली मानहानी ही फार वेदनादायी आहे. यामुळे सनातनचे हजारो साधक, लाखो हितचिंतक यांचीही समाजात मानहानी होत असल्याचे लक्षात घेऊन बातम्या द्याव्यात, अशी विनंती आहे. तसेच ही मानहानी रोखण्यासाठी नाईलाजास्तव सनातन संस्थेने या अनधिकृत माहितीच्या आधारे केल्या जाणार्‍या खोट्या आरोपांच्या संदर्भात न्यायालयीन खटले दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजवर गेली 27 वर्षे अव्याहतपणे चालू असलेले तेजस्वी धर्मप्रसाराचे कार्य करणारी संस्था म्हणून सनातन संस्था उदयास आली आहे. अल्पावधीत मिळालेला जनाधार आणि कार्याचा विस्तार ही आम्हाला मिळालेली पोचपावतीच आहे. आजवर कोणताही उपक्रम परवानगीविना घेतला, कोणत्याही कार्यक्रमात गोंधळ उडाला, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागले, असे कधीही झालेले नाही. आजपर्यंत सनातन संस्थेच्या विरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. याचे कारण आम्ही संविधानिक मार्ग, लोकशाही मूल्ये,न्यायव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था यांचा केवळ मान राखतो म्हणून नाही, तर त्यानुसार आचरणही करतो. अशा एका आध्यात्मिक संस्थेला इतक्या गंभीर प्रकरणांत विनापुरावा जबाबदार धरणे, हे आश्‍चर्यकारक आहे. हा आमच्यावरील अन्याय आहे. हा अन्याय थांबवावा, अशी विनंती मी आपणा सर्वांना करतो.

आजवरच्या एकाही प्रकरणाच्या (ठाणे स्फोट, मडगाव स्फोट, चारही हत्या प्रकरणे) आरोपपत्रांत कुठेही सनातन संस्थेचे नाव नाही. सनातन संस्था आरोपी असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. सनातन संस्थेने देशविघातक कृत्य केले, असा कुठेही उल्लेख नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हे खोडसाळ आणि तथ्यहीन आहे.

आतंकवादविरोधी पथक न्यायालयात या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या उद्देशाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागते आणि इकडे बाहेर तपास होण्यापूर्वीच मराठा आंदोलनात स्फोट करण्याचा कट, ‘बकरी र्इद’ला घातपाताचा कट, 500 प्रशिक्षित कार्यकर्त्यांची सेना इत्यादी आरोप केले जातात, ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वत्र पसरवले जातात, हे सर्व राजकीय षड्यंत्र आहे. या प्रकरणी प्रसारित केल्या जाणार्‍या जातीवाचक संदेशांची चौकशीही शासनाने करून त्यामागे नेमके कोण आहे, हे शोधले पाहिजे.

हिंदुत्ववादी शासन सत्तेत असल्याने हिंदुत्वाला बदनाम करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा आणि सनातनसारख्या निष्पाप संस्थेला संपवण्याचा हा प्रकार आहे. कुत्र्याला पिसाळलेले म्हणा आणि ठार मारा हे या धर्मविरोधकांचे षड्यंत्र आहे. त्यामुळे सूज्ञ पत्रकारांनी या षड्यंत्राला बळी पडू नये, अशी आमची विनंती आहे. असे असले तरी सनातन संस्था करत असलेले धर्मप्रसाराचे कार्य आम्ही अधिक जोमाने, गतीने आणि शक्तीने करण्याचा प्रयत्न करू, तसेच सनातन संस्थेवर लादण्यात येत असलेली अघोषित बंदी आम्ही कदापि सफल होऊ देणार नाही, असा आम्ही निर्धार केला आहे, अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित सनातन संस्थेच्या पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार हे उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य रोखण्यासाठी षड्यंत्र !

हिंदु जनजागृती समिती ही समाजात धर्मशिक्षण देऊन हिंदूसंघटनाचे कार्य करते. यामुळे विविध विचारसरणी, कार्यपद्धती असणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून केले जात आहे. यामुळे देशभरातील संघटना जोडल्या जात आहेत. हिंदूंचे प्रभावी संघटन उभे राहून आज हिंदूंवरील अन्यायांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे रहात आहे. यामुळे हिंदूविरोधी शक्ती हे कार्य बंद पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला लक्ष्य करत आहेत. मात्र समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य हिंदु समाज प्रत्यक्ष पहात असून अशा षड्यंत्राला तो बळी पडणार नाही, अशी आमची खात्री आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी सांगितले.