40 वर्षात दोन ते 303 जागांपर्यंतचा प्रवास; पंतप्रधान मोदींकडून ध्येयपूर्ती

105

नवी दिल्ली :  केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आज आपला 40 वा स्थापना दिन साजरा करीत आहे. जेव्हा भारतीय जनता पक्षाने देशाच्या राजकीय इतिहासामध्ये प्रवेश केला असेल, तेव्हा कदाचित त्या काळात कोणालाही वाटले नसेल की एक दिवस देशात ऐतिहासिक विजय नोंद होईल आणि केंद्रत एकहाती सत्ता घेतली जाईल. 80 च्या दशकात जेव्हा भाजपची स्थापना झाली आणि पक्षाने प्रथम लोकसभा निवडणूक राजकीय पक्ष म्हणून लढविली, तेव्हा पक्षाच्या खात्यावर केवळ दोन जागा होती, असे असूनही पक्षाच्या नेत्यांनी धैर्य गमावले नाही.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या माध्यमातून आज पक्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पोहोचला आहे. 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले गेले. येथून सुरु झालेला प्रवास आज शिखरावर आहे. 40 वर्षांच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाने यापूर्वीही सत्ता मिळविली होती. परंतु सध्या भाजप इतिहास रचत आहे. संघर्षातून बाहेर पडलेला पक्ष आज सत्तेच्या शिखरावर आहे. भारतीय जनता पक्षाचा आतापर्यंतचा प्रवास आणि पक्ष कसा बनला ते जाणून घेणार आहोत.

भारतीय जनता पक्षाची 1980 साली स्थापना झाली, पण त्याआधी 1951 साली श्यामा प्रसाद मुखर्जी कॉंग्रेस सोडून भारतीय जनसंघ स्थापना केली होती. 1952 साली लोकसभा निवडणुकीत जनसंघाला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

यानंतर जनसंघाचा संघर्ष सुरूचं होता. जेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली तेव्हा जनसंघाने कॉंग्रेसविरोधात आवाज उठविला. आता आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर जनसंघाने आपलं रूप बदललं आणि इतर पक्षांसह जनता पक्षाची स्थापना केली. या पक्षाने 1977 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि मोरारजी देसाई यांना पंतप्रधान केले. देसाई यांना तीन वर्षांत माघार घ्यावी लागली आणि त्यानंतर जनसंघाने 1980 मध्येच भाजपची स्थापना केली.

भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी अध्यक्ष झाले. 1984 साली झालेल्या आठव्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रीय निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळाला. या निवडणुकीत भाजपच्या खात्यात केवळ दोन जागा मिळाल्या. 1984 च्या निवडणूकीत दोन जागा, 1989 मध्ये 85 जागा तर 1991 साली राम मंदिर प्रकरणानंतर 120 जागा मिळाल्या. यानंतरही पक्षाच्या जागा वाढतच गेल्या. 1996 मध्ये 161 जागा, 1998 मध्ये 182 जागा तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने इतिहास रचला. पक्षाला लोकसभेच्या 282 जागा मिळाल्या. त्याचवेळी 2019 मध्ये 303 जागा जिंकून भाजपने केंद्रात सत्ता मिळवली.

अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हा पहिले राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यानंतर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना 1986 मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले गेले. 1991 मध्ये ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले. तर 1993 साली लालकृष्ण अडवाणी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. दुसऱ्यांदा अडवाणी यांना हे स्थान देण्यात आले. दरम्यान, ज्येष्ठ नेते कुशाभाई ठाकरे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली.

2000 साली बंगारू लक्ष्मण यांची भाजप अध्यक्षपदी निवड झाली. 2001 मध्ये जन कृष्णमूर्ती यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली. २००२ मध्ये केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 2005 मध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली.  2010 साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2013 साली राजनाथ सिंह दुसर्‍यांदा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले. यानंतर 2014 साली अमित शहा यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. ऐतिहासिक विजयानंतर 2019 असल्याने जेपी नड्डा यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे

2014 साली ऐतिहासिक विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा ऐतिहासिक विजय मिळवला. 2014 च्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने लोकसभेच्या 282 जागा जिंकल्या. अमित शहा यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले. प्रथमच पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती करून सरकार स्थापन केले. यानंतर 2019 मध्ये भाजपाने 303 जागांवर कब्जा करून इतिहास रचला.