केशरी कार्डधारकांनाही कमी किंमतीत धान्य मिळणार, सवलतीच्या दरात धान्य दिल्याने राज्य सरकारवर 300 कोटींचा बोजा

186

मुंबई : महाराष्ट्रातील केशरी रेशन कार्ड धारकांनाही आता धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे, राज्यभरातील लॉकरडाऊनची परिस्थिती पाहता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसचं जगभरात थैमान आहे आणि देशभरात सुरू असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. सर्व अडचणींपैकी मुख्य प्रश्न आहे पोटाचा, कारण संचारबंदी असल्याने शाळा, कार्यालयं आणि इतर सर्वच ठिकाणं बंद आहेत,

ज्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होत आहे. ज्यांचा पगार महिन्याला होतो थेट, ज्यांचा पगार थेट बॅंकेत जमा होतो त्यांना काहीसा दिलासा आहे. मात्र ज्यांचं पोट डेली व्हेजेसवर आहे म्हणजेच रोजंदारीवर त्यांच्यासाठी हा काळ कठीण आहे. रोजच्या कमाईवर भूक भागवणाऱ्यांसाठी आता उत्पन्नाचा मार्ग बंद आहे, राज्य सरकारकडून याची दखल घेतली गेली आहे.

राज्यातील अन्नधान्य पुरवठ्याबाबत शरद पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नधान्य द्यावे याबाबत चर्चा झाली. लॉकडाऊनच्या परिस्थितीत केशरी रेशन कार्डधारक तसेच समाजातील गरीब घटक यांना योग्य अन्न-पुरवठा होणं गरजेचं आहे, आतापर्यंत केवळ पिवळ्या रेशन कार्डावर ही सुविधा उपलब्ध होती, मात्र मध्यमवर्गीयांची राज्यभरातील संख्या पाहता केशरी रेशन कार्ड धारकांनाही सवलत देण्याची शरद पवार यांची मागणी होती.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या चर्चेनंतर केशरी रेशन कार्डधारकांनाही ही सवलत देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता केशरी कार्डधारकांनाही कमी किंमतीत धान्य मिळणार आहे. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे. सवलतीच्या दरात धान्य दिल्याने राज्य सरकारवर तब्बल 300 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.